Mon, Nov 19, 2018 04:30होमपेज › Goa › खाणींवरील यंत्रे हलवण्याचे काम युद्धपातळीवर

खाणींवरील यंत्रे हलवण्याचे काम युद्धपातळीवर

Published On: Mar 12 2018 1:04AM | Last Updated: Mar 12 2018 12:01AMमडगाव : प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाण खात्याने मंगळवार, दि.13 मार्च नंतर खाणीवरील व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना दिल्याने दक्षिण गोव्यातील खाण मालकांनी खाणींवरील व्यवहार गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. खाण बंदीला सोमवारचा एकच दिवस उरला असून खाणींवरील उत्खनन प्रक्रिया थांबविण्यात आली  आहे. तसेच खाणीवरील वाहने आणि मशिन्स  अन्यत्र हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

खाण व्यवसाय दि. 13 पासून पूर्णपणे बंद करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. पण रस्त्यावर खनिज वाहतूक करणार्‍या ट्रकांची धडधड मात्र 14 रोजी सायंकाळपर्यंत चालणार आहे. खनिज उत्खनन प्रक्रियेसाठी मोठ मोठी अवजड यंत्रे वापरावी लागतात. खाणींवरून यंत्रे हलविण्याचे काम सर्व खाण कंपन्यांनी आठवड्यापूर्वीपासून सुरू केले होते.रात्री अकरानंतर सी टिप्परचा वापर करून यंत्रे हलवली जात होती. फोमेंतो कंपनीने असोल्डा-शेळवण या ठिकाणी असलेल्या नोवा धातू या बंद पडलेल्या प्रकल्पाच्या आवारात आपली अवजड यंत्रणा हलविण्यास प्रारंभ केला आहे. तर कोडली येथील सेसा गोवा वेदांता खाण कंपनीने गुड्डेगाळ येथील जागेत मशिनरी आणि मोठे ट्रक आणून ठेवण्यास सुरुवात केली आहे. या यंत्रांमध्ये कोमुत्सू या मोठ्या ट्रकांचा जास्त समावेश आहे. हे अवजड ट्रक खाणीत अंतर्गत वाहतूक करण्यासाठी वापरले जात आहेत.त्या व्यतिरिक्त खनिज साफ करण्याचे श्रीनिंग मशीन, मोठमोठाले जनरेटर अशा यंत्रांचा समावेश असतो. या सर्व यंत्रणा 14  मार्चपर्यंत  सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम खाण कंपन्यांकडून सुरू आहे.

कोडली येथील सेझा गोवा खाणीचे व्यवस्थापक जोसेफ कुएलो यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, सोमवार दि.12  पर्यंत सर्व व्यवहार पूर्ण होणार आहेत. पन्नास ट्रक, सात ते आठ शेवाळे,जीप गाड्या, जनरेटर या सर्व यंत्रणा कोडली खाणीवरून हलविण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.