होमपेज › Goa › उत्खनन बंदीचा अहवाल तयार करण्याचा निर्णय 

उत्खनन बंदीचा अहवाल तयार करण्याचा निर्णय 

Published On: Mar 14 2018 1:29AM | Last Updated: Mar 14 2018 1:29AMपणजी : प्रतिनिधी

खाण प्रश्‍नी  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन  करण्याच्या द‍ृष्टीने खाण खात्याची मंगळवारी (दि.13) तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत खाणींवरील खनिजांचे उत्खनन बंद झाल्याचा पुष्टी देणारा  अहवाल दि. 16 मार्च रोजी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्खनन करण्यात आलेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसंदर्भात  कायदेशीर सल्‍ला घेण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

खाण खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या या बैठकीत खाण बंदीचे पालन करण्यासाठी खाणींशी संबंधित  अन्य सरकारी खात्यांबरोबरच समन्वय साधण्यावर चर्चा करण्यात आली. खाण खात्याबरोबरच अन्य खात्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या पथकांची स्थापना केली जाईल. हे पथक राज्यातील खाणींवर जाऊन खनिज उत्खनन 15 मार्चनंतर सुरू तर नाही  ना, याची पाहणी करेल.  दरम्यान, या खनिज लिजांच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेला कुठलाही धोका पोहचू नये, यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असे निर्देश खाण खात्याच्या संचालकांना खाण सचिवांनी दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.