Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Goa › लेखापाल पदाच्या परीक्षेत सर्व आठ हजार उमेदवार अनुत्तीर्ण

लेखापाल पदाच्या परीक्षेत सर्व आठ हजार उमेदवार अनुत्तीर्ण

Published On: Aug 22 2018 12:55AM | Last Updated: Aug 22 2018 12:55AMपणजी : प्रतिनिधी

सरकारच्या लेखा खात्यामार्फत लेखापालांच्या (अकौंटंट) 80 पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी चाचणीचा निकाल धक्‍कादायक लागला असून परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे 8 हजार उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत. एकही उमेदवार पात्र ठरला नसल्याचे लेखा खात्याच्या संचालकांनी अधिसूचनेद्वारे मंगळवारी येथे जाहीर केले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लेखाधिकार्‍यांच्या 80 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. 10 हजार 712 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. पात्र उमेदवारांसाठी 7 जानेवारी 2018 ला लेखी परीक्षा घेण्यात आली असून त्यासाठी सुमारे आठ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर दोन महिन्यांत निकाल अपेक्षित होता.लेखापालांच्या जागेसाठी देण्यात आलेली प्रश्नपत्रिका खूप कठीण होती, अशा तक्रारी त्यावेळी काही उमेदवारांनी केल्या होत्या. सरकार कदाचित आता लेखापाल पदासाठी नव्याने 80 ऐवजी कमी पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करेल, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.

या सरकारी पदासाठी एकही उमेदवार पात्र ठरला नाही, असे जाहीर केले गेले तरी, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास लागलेला विलंब ही चर्चेची बाब ठरली आहे. मुख्यमंत्री अमेरिकेत असताना आता निकाल जाहीर केला गेल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारने अन्य काही खात्यांमध्येही भरतीसाठी नुकत्याच उमेदवारांच्या लेखी चाचण्या घेतल्या आहेत. त्या लेखी चाचण्यांचा निकाल जाहीर करण्यासही विलंब होऊ शकतो. लेखापाल पदासाठी झालेल्या चाचणीचा निकाल कसा लागतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता काही मंत्री व आमदारांमध्येही होती. शिवाय हजारो उमेदवारांचेही त्याकडे लक्ष होते. लेखा खात्याने आपली अधिसूचना खात्याच्या सूचना फलकावर लावली आहे.

लेखा खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍याला याविषयी विचारले असता परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जेवढे गुण मिळणे अपेक्षित होते तितके गुण एकाही उमेदवाराने मिळवलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

पुन्हा परीक्षेची शक्यता

लेखा खात्याच्या संचालकांनी तब्बल सात महिन्यांनी मंगळवारी या परीक्षेचा निकाल जाहीर केला.  मुख्यमंत्री तीन महिने अमेरिकेत होते त्यामुळे या परीक्षेचा निकाल जाहीर झाला नव्हता. दरम्यान, या पदांसाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सरकार विचारात घेऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. या पदांसाठी पुन्हा जाहिरात किंवा पुन्हा परीक्षा होऊ शकते. मात्र उमेदवारांना कमाल 45 वर्षे वयाची अट होती, त्यामुळे आता अनेकजण या स्पर्धेतून बाहेरही पडू शकतात, अशी चर्चा आहे.

उमेदवार  निराश 

लेखा खात्याच्या 80 अकौंटंटच्या पदांमध्ये 43 पदे सर्वसामान्य गटासाठी, 21 ओबीसी, 9 एसटी, 2 एससी आणि दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांची मुले व माजी सैनिकांसाठी प्रत्येकी 1 पद होते. एकाही गटातील उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलेला नाही, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.