Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Goa › राज्यात डॉक्टरांच्या संपामुळे बाह्यरुग्ण सेवा बाधित

राज्यात डॉक्टरांच्या संपामुळे बाह्यरुग्ण सेवा बाधित

Published On: Jul 29 2018 1:21AM | Last Updated: Jul 28 2018 11:59PMपणजी : प्रतिनिधी

‘राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2017’ च्या विरोधात भारतीय वैद्यकीय मंडळ (आयएमए)डॉक्टरांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात गोव्यातील डॉक्टरांनीदेखील  शनिवारी सहभाग घेतला. यामुळे  सकाळी 6 ते संध्याकाळी  6 वाजेपर्यंत इस्पितळातील बाह्यरुग्ण सेवेवर  परिणाम झाल्याचे दिसून आले.

आयएमए गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर म्हणाले की, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक  2017 च्या विरोधात गोव्यातील डॉक्टर या लाक्षणिक संपात सहभागी झाले आहेत. संपात सहभागी होताना रुग्णांना अत्यावश्यक सेवा दिली आहे. मात्र, ओपीडी बंद ठेवण्यात आले.राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक  2017 च्या विरोधात आहे. हा केवळ विद्यमान डॉक्टरच नव्हे तर  भविष्यातील डॉक्टरांसाठीदेखील घातक ठरणार आहे.  सदर विधेयक  संसदेत  सोमवार दि. 30 जुलै रोजी मांडण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय  वैद्यकीय  आयोग विधेयक  आयएमए बरखास्त करुन   राष्ट्रीय  आयोगाची स्थापना करण्याची तरतूद आहे. या आयोगावरील समिती ही 29 सदस्यांची असेल. त्यावरील  नऊ सदस्य हे निवडण्यात येतील, तर अन्य सदस्यांची निवड सरकार करेल.अशी तरतूद विधेयकात आहे. त्यामुळे  या समितीवर सर्व राज्यांना प्रतिनिधीत्व मिळेल, याचीही खात्री नसल्याचे त्यांनी सांगितले.

या विधेयकातील तरतुदीनुसार   एमबीबीएससाठी एकच अंतिम  परीक्षा घेतली जाईल. मात्र, याचा फायदा शहरी विद्यार्थ्यांना अधिक होईल. ग्रामीण विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. सरकारने जानेवारी महिन्यात हे विधेयक संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला  होता. मात्र, त्याला  देशभरातील डॉक्टरांनी विरोध केल्याने सदर विधेयक संसदीय स्थायी समितीकडे वर्ग करण्यात आले होते. सरकारने  पुन्हा हे विधेयक संमत करण्याचा  प्रयत्न केल्यास पुढील कृती ठरवू, असा इशारा पेडणेकर यांनी दिला.