Sat, Apr 20, 2019 10:07होमपेज › Goa › ‘गोसुमं’, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची

‘गोसुमं’, भाजप कार्यकर्त्यांत बाचाबाची

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 14 2018 1:31AMपणजी : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेवेळी रविवारी गोवा सुरक्षा मंच (गोसुमं) आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये  बाचाबाचीचा प्रसंग उद्भवल्याने  पोलिसांनी मध्यस्थी करून तंग झालेले वातावरण शांत केले.  

बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर रविवारी झालेल्या राज्यभरातील बूथ कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यावेळी शहा यांना विरोध करण्यासाठी गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली. गोसुमंचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यावेळी म्हणाले, कर्नाटक राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात शहा यांनी म्हादईचे पाणी सहा महिन्यांत कर्नाटकच्या शेतकर्‍यांना देण्याचे आश्‍वासन दिले होते. म्हादईबाबतच्या विधानाबाबत राज्यात संताप असल्याचे शहा यांना निदर्शनांद्वारे दाखवण्यात येत आहे. म्हादईचा प्रश्‍न जलतंटा लवादासमोर अंतिम टप्प्यात पोचला असून लवादाचा निर्णयच दोन्ही राज्यांनी स्वीकारण्याची गरज आहे.

सभेच्या वेळी गोसुमंचे कार्यकर्ते बांबोळी येथील स्टेडियमजवळ येताना स्थानिक पोलिसांनी त्यांना सभास्थळापासून 300 मीटर्सच्या कक्षेबाहेर अडवले. शहा यांचा ताफा सभास्थळी पोहचल्यावर गोसुमंच्या कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सभा संपल्यानंतर रस्त्यावरून गाडीतून जाणार्‍या भाजप कार्यकर्त्यांना रस्ता अडवणूक झाल्यामुळे भाजप आणि गोसुमंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजप कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग झाले. यावेळी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळे काढून शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांविरूध्द गोसुमं कार्यकर्त्यांनी संध्याकाळी उशिरा आगशी पोलिसात  तक्रार नोंदवली.