Sat, Nov 17, 2018 06:16होमपेज › Goa › पर्रिकरांना डिस्चार्ज; अर्थसंकल्प सादर करणार

पर्रिकरांना डिस्चार्ज; अर्थसंकल्प सादर करणार

Published On: Feb 22 2018 2:04PM | Last Updated: Feb 22 2018 2:04PM
पणजी : प्रतिनिधी

गोव्याचे मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्‍चार्जनंतर सर्वाना आश्‍चर्याचा धक्का देत दाबोळी विमानतळावर गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पर्रीकर गोव्यात दाखल झाले. ते स्वत:  राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पर्रीकर गुरूवारी सकाळी ११.४० वाजता दाबोळी विमानतळावर खास विमानाने उतरले. त्यांच्या येण्याची बातमी कोणालाही कळवण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांची गाडी, पोलिस फौजफाटा या गोष्टी टाळून एका खासगी गाडीचा वापर करून ते पणजीत दाखल झाले.  मुख्यमंत्री दूपारी 2 वाजता आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेणार असून 2.30 वाजल्यानंतर ते स्वत: अर्थसंकल्प मांडणार आहेत. 

पर्रीकर 15 फेब्रुवारीपासून  मुंबईच्या लिलावती इस्पितळात पचनक्रियेतील बिघाडावर उपचार घेत होते. त्यांच्या अनुपस्थितीत महिनाभराचे ठरवण्यात आलेले विधानसभेचे अधिवेशन चार दिवसासाठी करण्यात आले आहे. विधानसभेच्या सोमवारपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. ज्येष्ठ मंत्री म्हणून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर यांना अर्थसंकल्प विधानसभा पटलावर ठेवण्यास सभापतींनी सांगितले आहे. सभापती डॉ प्रमोद सावंत यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर ती तात्पूर्ती सोय केली होती. 

पर्रीकर यांना उपचारासाठी अमेरिकेत जाण्याची आवश्यकता नसून आजार गंभीर असला तरी त्यांनी मुंबईतच उपचार घ्यावेत असा सल्ला त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करुन ते तातडीने आज संध्याकाळी मुंबईला परतण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.