Tue, Mar 19, 2019 03:14होमपेज › Goa › व्यापार परवान्याच्या जाचक अटी मागे घ्या

व्यापार परवान्याच्या जाचक अटी मागे घ्या

Published On: Apr 18 2018 12:48AM | Last Updated: Apr 18 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी

व्यापार परवाना नूतनीकरणासाठी पणजी मनपाकडून लागू करण्यात आलेल्या जाचक अटी मागे घ्याव्यात,  अशी मागणी पणजी हॉटेल व व्यापारी संघटनेतर्फे आयुक्‍त अजित रॉय व महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्याकडे मंगळवारी निवेदनाव्दारे करण्यात आली. 

संघटनेचे निमंत्रक बार्बेन सापेको यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन सादर करण्यात आले. आयुक्‍त रॉय यांनी यावेळी सदर प्रकरणी तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले. व्यापार परवान्यांच्या नूतनीकरणासाठी अग्‍निशमन दलाकडून व अन्य संबंधित सरकारी  खात्यांकडून ना हरकत दाखला सक्‍तीचा करण्यात आला आहे. याशिवाय  मनपाकडून दरवर्षी व्यापार परवाना शुल्क, साईन बोर्ड शुल्क, कचरा व घरपट्टी शुल्कातही वाढ केली जाते. जीएसटीमुळे यापूर्वीच व्यापार्‍यांचे कंबरडे मोडले आहे. मनपाकडून ट्रेड परवान्यांच्या नूतनीकरणासाठी लागू करण्यात आलेल्या जाचक अटींमुळे  त्रासात अधिकच भर पडली आहे, असे सोपको यांनी सांगितले.

अन्‍न व औषध प्रशासन, शॉप व इस्टेब्लिशमेंट खात्याकडून पाच ते दहा वर्षांचा परवाना जारी केला जातो. यामुळे दरवर्षी नूतनीकरणाची आवश्यकता भासत नाही. मनपानेदेखील पाच ते दहा वर्षांसाठी हा व्यापार परवाना जारी करुन जाचक अटी  काढून टाकाव्यात. छोट्या व्यापार्‍यांना अग्‍निशमन दलाचा ना हरकत दाखला सक्‍तीचा करण्यात आला असून ही अट  हटवण्यात यावी.  व्यापार परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुटसुटीत करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

Tags : goa news, demand for a hotel, trader association,