Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Goa › मासळी उत्पादनात घट : विनोद पालयेकर

मासळी उत्पादनात घट : विनोद पालयेकर

Published On: Aug 03 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 12:54AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात मासळीच्या उत्पादनात काही प्रमाणात घट झाली असली तरी मासळीच्या निर्यातीत मागील पाच वर्षांत वाढ झाली असल्याची माहिती मत्स्योद्योग मंत्री विनोद पालयेकर यांनी गुरुवारी  विधानसभेत दिली. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री पालयेकर यांनी आकडेवारीतून सदर माहिती दिली. 

राज्यातील मच्छीमारांकडून 2014  साली 1.28 लाख टन मासळी पकडण्यात आली. हे प्रमाण 2017 साली फक्‍त 1.20 लाख टनावर पोचले. त्याआधी, 2013 साली फक्‍त 87 हजार 984 टन असलेले मासळीचे उत्पादन 2014 वर्षात अचानक वाढले होते. त्यानंतर, 2015 व 2016 साली मासळीच्या उत्पादनात पुन्हा घट झाली असून अनुक्रमे 1.08 लाख आणि 1.01 लाख टन झाले. मात्र .  गत 2017 साली मासळीच्या उत्पादनात वाढ होऊन ते 1.20 लाख टनापर्यंत पोचले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

समुद्रातील मासळीची 2017 सालची आकडेवारी पाहता ताल्ल्याचे उत्पादन सर्वाधिक (38 हजार 551टन) आणि त्या मागोमाग बांगड्यांचे (29 हजार 511 टन) उत्पादन होते. कोळंबीचे 9652 टन उत्पादन झाले. 

उत्पादनाच्या तुलनेत माशांच्या निर्यातीत वाढ झाली असून 2013 आणि 2014 साली अनुक्रमे 33 हजार 939  आणि 40 हजार 365 टन  मासळीची निर्यात  झाली. माशांच्या निर्यातीत 2015 साली अचानक घट होऊन ती 34 हजार 814 टनापर्यंत खाली आली. मात्र 2016 यात समाधानकारक वाढ होऊन 38 हजार 209 टन निर्यात झाली. या तुलनेत  2017 साली मासळीची 44 हजार 444 टन निर्यात झाली असल्याचे आकडेवारीत दाखवण्यात आले आहे.