Wed, Apr 24, 2019 22:06होमपेज › Goa › बागा, कळंगुट समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी 

बागा, कळंगुट समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी 

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMबार्देश : प्रतिनिधी

कळंगुट, बागा समुद्र किनारे स्थानिक लोकांबरोबरच देशातील विविध राज्यांतून  येणार्‍या पर्यटकांनी  फुलले आहेत.  सर्व शाळांना एप्रिल, मे  महिन्यामध्ये सुट्ट्या असल्यामुळे स्थानिक लोक आणि  देशी पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत किनार्‍यावर येत असतात. बार्देस तालुक्यातील कांदोळी, कळंगुट, बागा हे किनारे  गोमंतकातील इतर  किनार्‍यापेक्षा  जास्त  प्रसिद्ध आहेत त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.   

सध्या वातावरणात उष्मा वाढला असल्यामुळे पर्यटकांची कुटुंबासह कळंगुट व बागा समुद्र किनार्‍यावर  गर्दी होऊ लागली आहे. समुद्र स्नान केल्याने ते आरोग्यास उपकारक असल्यामुळे  काही   गोमंतकीय समुद्रात डुंबताना आढळतात. तसेच शाळांना सुट्टी असल्यामुळे देशी पर्यटकांच्या संख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, मध्यप्रदेश आदी राज्यांतून स्वत:ची वाहने घेऊन मोठ्या प्रमाणात  पर्यटक दाखल झाले आहेत. 

कळंगुट, कांदोळी   समुद्र किनार्‍यावर  समुद्र सफर करण्यासाठी   जलक्रीडा मोटरबोटी आहेत. या बोटीमध्ये एक ते दोन प्रवाशांना बसवून समुद्रात फेरफटका मारला जातो. यासाठी पर्यटन खात्याने बोट मालकांना दर ठरवून दिलेले आहेत. परंतु पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हे जलक्रीडा बोटवाले   पर्यटकांकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारून लुबाडणूक करताना आढळून येत आहेत.  जास्त दरआकारणी केली जात असल्यामुळे काही लोक  व  पर्यटक नाराजी  व्यक्त करतात. 

कळंगुट समुद्र किनार्‍यावर  स्वच्छतागृह, कपडे बदलण्यासाठी खोली, गोड्या पाण्याच्या आंघोळीची सोय  करण्यात आली  आहे. त्यामुळे या समुद्र किनार्‍यांवर आंघोळीला येण्यासाठी  पर्यटक जास्त पसंती देतात. इतर समुद्र किनार्‍यांप्रमाणे  महिलांना   उघड्यावर  कपडे बदलावे लागत  नाहीत. 

पर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून हॉटेल बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ऑक्टोबर ते मे असा पर्यटन हंगाम चालतो.  दरवर्षी मोठ्या प्रमाणात देशी विदेशी पर्यटक  येत असतात. पर्यटन हंगामात बार्देश तालुक्यात  कळंगुट, हणजूण, कांदोळी, बागा समुद्र किनार्‍याजवळ असलेल्या हॉटेलमध्ये राहण्यास खोल्या  मिळत  नसल्याने  जवळपास असलेल्या घरामध्ये  भाड्याने खोल्या घेऊन पर्यटक राहतात. त्यामुळे हॉटेल व घर  मालकांना बराच फायदा  होतो.   समुद्र किनारी  भागातील लोकांनी  आपल्या घराशेजारील मोकळ्या जागेत खास  भाडेकरूंना राहण्यासाठी खोल्या बांधून त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. पर्यटन हंगामाच्या अखेरीस  देशी पर्यटकांबरोबरच स्थानिक लोकांची   समुद्रस्नानासाठी  मोठी गर्दी  दिसून येते.