Mon, May 25, 2020 20:11होमपेज › Goa › नाताळ, नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

नाताळ, नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची गर्दी

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 11:23PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

नाताळ तसेच नववर्ष स्वागतासाठी राज्यात देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होऊ लागले आहेत. यात देशी पर्यटकांची  संख्या अधिक असून येत्या काही दिवसांत या संख्येत आणखी वाढ अपेक्षित आहे. पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन हॉटेल बुकिंग होत असून जीटीडीसीची रेसिडेन्सीज आणि खासगी हॉटेल्सच्या खोल्यांचे   हाऊसफुल्ल बुकींग  झाले आहे.

किनारी भागातील हॉटेल्सचे  पर्यटकांकडून बर्‍यापैकी बुकिंग सुरु आहे. 24 डिसेंबर 2017 ते 1 जानेवारी 2018 दरम्यान किनारी भागासह शहरातील हॉटेल्सचे पर्यटकांकडून  बुकिंग केले जात असून बहुतांश गर्दी वाढत आहे, अशी माहिती गोवा हॉटेल्स व रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी दिली. गुजरात, महाराष्ट्र, दिल्‍ली, तामिळनाडू येथील पर्यटकांचा यात आकडा मोठा आहे. नाताळ व नववर्ष स्वागतासाठी  गोवा हे नेहमीच  देशी पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात.नाताळ सण दोन दिवसांवर  असल्याने गोव्यात पर्यटक दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. संध्याकाळच्या वेळी  मिरामार, मोरजी, हरमल, कोलवा, केळशी, कळंगुट आदी समुद्र किनार्‍यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. 

पणजी, पर्वरी, मडगाव, वास्को  प्रमाणेच राज्यातील किनारी भागांमध्ये  पर्यटक वाहनांची संख्याही वाढली आहे. पर्यटक वाहनांमुळे विशेषतः संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी  होत असून वाढती वाहतूक कोंडी हाताळताना वाहतूक पोलिसांना कसरत करावी लागत आहे.  पणजीतील मांडवी पूल तसेच कुठ्ठाळी येथील झुवारी पुलावरील पर्यटक हंगामातील वाढती वाहन संख्या व त्यामुळे उद्भवणारी कोंडी नियंत्रित करण्यासाठी पोलिस खात्याकडून वाहतूक पोलिसांची विशेष पथके 23 डिसेंबर पासून  तैनात केली जाणार आहेत.