Tue, Jul 23, 2019 07:03होमपेज › Goa › कुडचडेत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर

कुडचडेत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर

Published On: Jul 09 2018 1:11AM | Last Updated: Jul 09 2018 1:11AMमडगाव : प्रतिनिधी

गेल्या तीन वर्षांत वाढलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्‍वभूमीवर कुडचडेत कायदा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.2016 मध्ये गाजलेल्या शोभा करमली खून प्रकरणानंतर  सुरू झालेल्या खुनांचा आकडा चार वर पोहचला आहे. तीन घटनांमध्ये महिलांना आपला जीव गमवावा लागला असून एका घटनेत चक्क पत्नीने तिच्या साथीदारांच्या मदतीने पतीचा खून करून मृतदेहाचे तुकडे घाटात फेकल्याचा प्रकार घडला आहे.शोभा करमली खून प्रकरणाचा तपास लागलेला नाही, तोच बेपकेगाळ येथे  55 वर्षीय सुकोरिना फर्नांडिस या महिलेचा अशाच प्रकारे भर दिवसा राहत्या घरी खून होण्याच्या घटनेचे कुडचडे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

करमली खुनाच्या घटनेनंतर  दोन महिन्यात कुडचडे पोलिसस्थानक  क्षेत्रात येणार्‍या मिराबाग इथे मंजुषा भंडारी(27)या विवाहित महिलेचा मृतदेह तिच्या मिराबाग येथील  घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता.चौकशीअंती सरकारी कर्मचारी असलेला तिचा पती मदनंत भंडारी याने तिचा  चारित्र्याच्या संशयावरून कोयत्याने वार करुन तिचा खून केल्याचे समोर आले.त्यांना दोन लहान मुले देखील आहेत.मदनंत याने   गुन्हा कबूल केल्याने या प्रकरणात पोलिसांना अधिक  तपास करावा लागला नाही. खून करून मदनंत  कामावर गेला होता.नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले असता त्याने गुन्हा कबूल केला.

  2017 साल कुडचडेत क्रॉस मोडतोड तसेच धार्मिक स्थळांच्या विटंबनेचे  प्रकरण बॉय उर्फ फ्रान्सिस परेरा याच्या अटकेमुळे गाजले.कुडचडे स्मशानभूमीतील क्रॉसची मोडतोड करण्याबरोबर दक्षिण गोव्यातील धार्मिक प्रतिमांची विटंबना करण्याच्या प्रकरणामुळे गोवा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते.पण कुडचडे पोलिसांनी तपास लावून मोरायले येथील टॅक्सी चालक  परेरा याला पकडले.सुरुवातीला सर्व प्रकरणांची कबुली देणार्‍या परेरा याच्यावर अद्याप कोणतेच गुन्हे सिद्ध झालेले नाहीत.त्याची सध्या जामिनावर सुटका झालेली आहे.

2018 च्या मे महिन्यात कुडचडेला हादरून सोडणारी आणखी एक खुनाची घटना समोर आली.ही घटना एप्रिल मध्ये घडली होती.बसुराज बाकडी (38)या बिगर गोमंतकीय इसमाचा त्याच्याच पत्नीने आपल्या   तीन प्रियकरांच्या मदतीने खून करून मृतदेहाचे तुकडे कुडचडे पासून तीस किमी. अंतरावरील अनमोड घाटात फेकले होते.कुडचडे पोलिसस्थानकापासून अवघ्या काही मीटर अंतरावर हा  प्रकार घडला होता.बेपकेगाळ येथील भाड्याच्या फ्लॅट मध्ये बसुराज बाकडी याचा त्याची पत्नी कल्पना बाकडी हिने गळा दाबून खून केला होता.हा प्रकार उघडकीला येऊ नये,यासाठी तिने तिचे प्रियकर  सरकारी कर्मचारी पंकज परवार,अब्दुल शेख,सुरेश कुमार आणि आदित्य गुज्जर यांच्यासमवेत फ्लॅटमध्येच बसुराजच्या मृतदेहाचे विळी आणि सुर्‍याने  तुकडे केले होते.  मृतदेहाचे तुकडे त्यांनी अनमोड घाटात नेऊन फेकून दिले होते.या घटनेच्या एका महिन्यांनंतर याच प्रकरणातील संशयित अब्दुल याच्या पत्नीने   समाजकार्यकर्त्या महिलेच्या मदतीने कुडचडे पोलिसांना ही माहिती दिल्याने प्रकार उघडकीला आला होता.पोलिसांनी नंतर प्रयत्न करून या खून प्रकरणातील महत्वाचा संशयित गुज्जर याला ताब्यात घेऊन इतर पुरावे गोळा केले होते.

या प्रकाराला तीन महिने पूर्ण होण्याच्या आतच शुक्रवार दि.6 जुलै  रोजी भरदिवसा पुन्हा बेपकेगाळ येथील महिला सुकोरिना फर्नांडिस(55) हीचा तिच्या राहत्या घरी खून होण्याच्या घटनेने कुडचडे शहर आणखी एकदा हादरले आहे. सुकोरिनाच्या पतीचा शवपेट्या  बनवण्याचा व्यवसाय आहे.तिच्या खून प्रकरणी तिची  बहिण मिलाग्रीना ट्रावासो हिने  पोलिसात तक्रार दाखल केली आहे.घरात तिचा मृतदेह आढळला असून तिच्या गळ्यावर मारहाणीचे व्रण आहेत.श्वान पथक आणि ठसेतज्ञांच्या मदतीने कुडचडे पोलिसांनी मारेकर्‍याच्या शोध घेण्याचा प्रयत्न  केला होता, पण 48 तास उलटूनही  कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.कुडचडे भागात वाढत चाललेल्या गुन्ह्यांमुळे कुडचडेवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुडचडे पोलिसांनी यापूर्वी अनेक गंभीर  गुन्ह्यांच्या तपासात दक्षिण गोवा पोलिसांना मदत केली आहे,ज्यात बेतालभाटी सामूहिक बलात्कार प्रकरणी संशयितांना पकडण्याबरोबर,बसुराज बाकडी खून प्रकरणातील आरोपी गुज्जर याला ताब्यात घेण्यासाठी, कुडतरी दरोडा प्रकरण,सावर्डे पूल कोसळून झालेल्या अपघाताच्या वेळी मदत कार्य,क्रॉस मोडतोड प्रकारणाचा तपास अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे.कुडचडे पोलिसांनी कुडचडे आणि सावर्डेत वाढत चाललेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत सतर्कता बाळगण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया लोक व्यक्त करीत आहेत.

पोलीस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी ‘पुढारी’शी  बोलताना सांगितले,की  शोभा करमली खून प्रकरणी पोलिसांनी तपासात कोणतीच  उणीव ठेवलेली नाही. तपासात काहीच निष्पन्न झाले नसले,तरी आज न उद्या सत्य बाहेर पडेल. सांगे, काणकोण, केपे आणि कुडचडे अशी चार पोलिस स्थानके आपल्या अख्त्यारित येत असून काही ठराविक प्रकरणे वगळता   बहुतांश प्रकरणांचा छडा लावण्यात यश आले  आहे,असेही ते म्हणाले.