Wed, Apr 24, 2019 16:29होमपेज › Goa › कंत्राटी कामगारांसाठी ठिय्या

कंत्राटी कामगारांसाठी ठिय्या

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:31AMपणजी : प्रतिनिधी

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणार्‍या 36 कंत्राटी कामगारांना अचानक सेवेतून कमी केल्याच्या निषेधार्थ प्रदेश महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात सेवेतून कमी करण्यात आलेले कामगारदेखील सहभागी झाले होते.

कामगारांना त्वरित पूर्ववत सेवेत  घ्यावे, अशी मागणी यावेळी   उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांच्याकडे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी केली. मात्र, त्यावर मोहनन यांनी कुठलेही ठोस उत्तर दिले नाही. 

कुतिन्हो म्हणाल्या, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या  पाच वर्षांहून अधिक काळापासून 37 कामगार कनिष्ठ कारकून या पदावर काम करीत होते. मात्र, या कामगारांना   सोमवारी अचानक सेवेत रुजू होऊ नये, असे सांगून याबाबतचा आदेश  अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांनी जारी केल्याचे कळवण्यात आले. 

सदर प्रकारामुळे बैचेन झालेल्या या कामगारांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांची भेट घेतली. मोहनन यांनीदेखील या कामगारांची सेवा रद्द केल्याचे सांगितले. सेवेतून  अचानक कमी केल्याने  कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. अनेक कुटुंबे या कामगारांच्या रोजगारावर  अवलंबून आहेत. सेवेतून कमी करण्यापूर्वी किमान या कामगारांना त्याची कल्पना देणे अपेक्षित होते. त्याचबरोबर या कामगारांना त्यांचा सहा महिन्यांचा पगारही देण्यात आला नसल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले.

प्रदेश महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेव्हा मोर्चा नेण्यात आला तेव्हा जिल्हाधिकारी मोहनन या कार्यालयात उपस्थित नव्हत्या. त्यामुळे जोपर्यंत त्या येत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा  इशारा आंदोलनकर्त्यांनी देताच  जिल्हाधिकारी मोहनन कार्यालयात दाखल झाल्या.