Sat, Nov 17, 2018 02:40होमपेज › Goa › मालवण समुद्र किनारी रंगीत लाटा

मालवण समुद्र किनारी रंगीत लाटा

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 11:54PMमालवण : वार्ताहर

मालवण शहरातील किनारपट्टी भागात  बुधवारी  रात्री अनोख्या रंगीत समुद्री लाटा निर्माण झाल्याचे दिसून आले. रंगीत समुद्री लाटा पाहण्यासाठी नागरिकांनी किनार्‍यावर एकच गर्दी केली होती. बायोलुमीनेसन्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या या रंगीत लाटांना स्थानिक भाषेत ‘झारो लागणे’ असे संबोधले जाते. समुद्र व खाडीच्या पाण्याच्या होणार्‍या घुसळणीने ही प्रक्रिया निर्माण होत असल्यानेच अशा रंगीत लाटा निर्माण होत आहेत. येत्या संकष्टीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

काल चंद्रग्रहण होते. यात काही नागरिक येथील बंदर जेटी परिसरात फेरफटका मारण्यास गेले असताना त्यांना किनार्‍यावर रंगीत लाटा धडकत असल्याचे दिसून आले. याची माहिती सर्वत्र पसरताच शहरातील नागरिकांनी रंगीत लाटा पाहण्यासाठी बंदर जेटी परिसरातील किनार्‍याकडे धाव घेतली होती. रॉकगार्डन परिसर, चिवला वेळ, दांडी येथील किनार्‍यावर या रंगीत लाटांचे दर्शन होत होते.  

यात समुद्राच्या पाण्यास एवढी लकाकी प्राप्त होते की समुद्रातील मासळीला मच्छीमारांनी टाकलेले जाळेही दिसून येते. त्यामुळे मासळी जाळी टाकलेल्या भागात फिरकतही नाही. यामुळे सध्या गिलनेट पद्धतीने होणारी मासेमारी पूर्णतः बंद असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

या रंगीत लाटांसंदर्भात सागरी जीव संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्याच्या थंडीच्या वातावरणात ही प्रक्रिया सुरू असते. भरती, ओहोटीच्या काळात खाडीतील सूक्ष्म जीव तसेच अन्य छोटी प्रवाळे समुद्राच्या पाण्यात मिसळत असल्याने ही प्रक्रिया होत आहे. या प्रक्रियेला बायोलुमीनेसन्स म्हणून ओळखले जाते. समुद्रातील सूक्ष्म जीवांमुळेच समुद्री लाटा रंगीत दिसून येतात. या हंगामात किनारपट्टी भागात अशा रंगीत लाटा निर्माण होत आहेत. आकर्षक अशा या रंगीत लाटा पाहण्याची संधी पर्यावरणप्रेमींना मिळाली आहे. मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांच्याशी संपर्क साधला असता सध्या किनारपट्टी भागात रात्री ज्या रंगीत लाटा किनार्‍यावर धडकत आहेत त्यांना स्थानिक भाषेत ‘झारो लागणे’ असे म्हटले जाते. खाडी व समुद्रातील पाणी यांच्यात घुसळणीची प्रक्रिया होत असल्याने खाडीतून येणारे सूक्ष्म जीव व शेवाळ यामुळे रंगीत लाटा निर्माण होत आहे. सध्या बारा फॅदमच्या अंतरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असून ती येत्या संकष्टीपर्यंत सुरू राहणार आहे.