Sat, Feb 23, 2019 01:56होमपेज › Goa › आयात मासळीची राज्याच्या सीमांवर तपासणी : पालयेकर

आयात मासळीची राज्याच्या सीमांवर तपासणी : पालयेकर

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 17 2018 11:22PMपणजी : प्रतिनिधी

शेजारील राज्यांतून गोव्यात आयात होणार्‍या मासळीची तपासणी करण्यासाठी मत्स्योद्योग खाते आणि अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) विशेष संयुक्‍त पथक येत्या सोमवारपासून सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे मत्स्योद्योगमंत्री विनोद पालयेकर यांनी सांगितले. परराज्यातून गोव्यात येणार्‍या माशांमध्ये ‘फार्मोलिन’ या घातक रसायन आढळून आल्याचे ‘एफडीए’ने आधी जाहीर केले होते व नंतर दुसर्‍यांदा केलेल्या चाचणीनंतर ‘फार्मोलिन’चे प्रमाण घातक नसल्याचे स्पष्ट करून मासे खाण्यासाठी सुरक्षित आहेत, अशी भूमिका एफडीएने घेतल्याने राज्यात खळबळ उडाली होती. या संदर्भात गोमंतकीयांच्या आरोग्याविषयी सरकार गंभीर असून आपण स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते.

या प्रकरणी मत्स्योद्योगमंत्री पालयेकर म्हणाले की, पुढच्या आठवड्यापासून राज्याच्या सर्व सीमांवर राज्यात येणारे माशांचे ट्रक तपासण्यात येणार आहेत. माशांमध्ये ‘फार्मोलिन’चा अंश आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी माशांचे नमुने घेतले जाणार आहेत. यासाठी एफडीएने खास चाचणीचे ‘किट’ आणले आहे. कोणत्याही ट्रकमधल्या माशांमध्ये कमी प्रमाणातही ‘फार्मोलिन’चा अंश सापडला तर सर्व मासे जप्त करून ते नष्ट केले जाणार आहेत.