Thu, Jul 18, 2019 02:38होमपेज › Goa › सलग दुसर्‍या दिवशी झाडाझडती

सलग दुसर्‍या दिवशी झाडाझडती

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 11:33PMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेचे नगरसेवक उदय मडकईकर यांच्या  बनावट राबता दाखल्याप्रकरणी  पणजी पोलिसांनी सलग दुसर्‍या दिवशी पणजी मनपा कार्यालयाची झडती घेतली. पोलिसांनी यावेळी राबता दाखल्यासंदर्भातील फाईल्सची पडताळणी केली. याप्रकरणी   मडकईकर यांना  मदत केल्याचा आरोप असलेले  तांत्रिक  विभागातील  दीपक सातार्डेकर यांनाही पोलिसांनी समन्स बजावून शुक्रवारी (दि.22) चौकशीसाठी बोलावले आहे. अन्य काही आजी, माजी नगरसेवक पोलिसांच्या रडारवर आहेत.

दरम्यान, पणजी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केल्यानंतर  नगरसेवक उदय मडकईकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.पणजी पोलिसांनी गुरुवारी (दि.21) मनपा कार्यालयाची झडती घेतली. यावेळी राबता दाखल्यासंदर्भातील फाईल्सची छाननी करण्यात आली. मात्र, मडकईकर यांच्या  भाटले येथील कथित इमारतीच्या  बनावट राबता दाखल्यासदंर्भातील फाईल गायब होती. या इमारतीच्या घरपट्टी, तसेच अन्य आवश्यक त्या परवान्यांबाबतची नोंदही आढळून आली आहे. मनपा कर्मचार्‍यांनी याविषयी पोलिसांना   उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सांगण्यात आले.    

बनावट  राबता दाखला प्रकरणी पणजी पोलिसांनी बुधवारीदेखील मनपाची झडती घेतली होती. मनपा नगरसेवक उदय मडकईकर व त्यांच्या  नातेवाईक गीता मडकईकर यांनी भाटले येथील त्यांच्या इमारतीसाठी राबता दाखला मिळवण्यासाठी तत्कालीन मनपा आयुक्‍त मेल्वीन वाझ यांची बनावट सही केल्याच्या आरोपावरून पणजी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.   मनपा आयुक्‍त अजित रॉय यांनी  दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे  हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे  मनपामध्ये एकच खळबळ उडाली आहे.  सदर प्रकरणात आपला कुठलाच सहभाग नसल्याचा दावा मडकईकर करीत आहेत. पोलिसांनी मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून  कारवाईस सुरुवात केली आहे.