कॅसिनो परवान्यांसंबंधी निर्णयाचा फेरविचार करा

Last Updated: Oct 11 2019 1:48AM
Responsive image
मंत्री मायकल लोबो

Responsive image

पणजी : प्रतिनिधी

मांडवी नदीतील कॅसिनो जहाज मांडवी नदीच्या पलिकडील बाजूला अथवा अन्य पर्यायी ठिकाणी नेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कॅसिनो व्यावसायिकांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याच्या निर्णयाचा पणजी महानगरपालिकेने फेरविचार करावा, अशी सूचना बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी केली.

येथील पणजी बंदरावरील एका कार्यक्रमासाठी आलेले मंत्री लोबो पत्रकारांशी अनौपचारीकरीत्या बोलत होते. ते म्हणाले की, पणजीचे आमदार अतानसिओ मोन्सेरात आणि महापौर उदय मडकईकर यांनी मांडवीतील सर्व कॅसिनो हटवण्याची मागणी केली आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून राज्यात असलेले ऑफ शोअर कॅसिनो असे तडकाफडकी काढून टाकणे शक्य नाही. कॅसिनो मालकांना मागील काँग्रेस सरकारनेच परवानगी दिली असली तरी सरकार ही सततची प्रक्रिया आहे. यामुळे राज्यात येणार्‍या गुंतवणूकदारांना धक्का बसेल असे कोणतेही कृत्य राज्य सरकार करू शकत नाही. 

पणजीत कॅसिनोमुळे काही समस्या निर्माण होत असल्या तरी याच कॅसिनोमुळे अनेकांना रोजगार आणि सेवा देण्याची संधी मिळत आहे. कॅसिनोवर टॅक्सी चालक, हॉटेल, रेस्टॉरंट, पायलट आदींना रोजगार मिळत आहे. कॅसिनो आग्वाद खाडीजवळ हलवण्याच्या प्रयत्नाला सध्या यश मिळू शकले नसले तरी मांडवीच्या दुसर्‍या किनार्‍याला एक कॅसिनो हलवण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मांडवीतील सर्व कॅसिनोंचे स्थलांतर केले जाईल, मात्र त्यासाठी पणजीकरांना थोडी कळ सोसावी लागेल, असे मंत्री लोबो यांनी सांगितले. 

‘परवाने नूतनीकरणाचा प्रश्नच नाही’

मंत्री मायकल लोबो यांच्यासमोर उभे राहून पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी कॅसिनो व्यावसायिकांचे परवाने नूतनीकरण करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ठामपणे सांगितले. मडकईकर म्हणाले की, पणजी मनपाने एकमताने शहरातील कॅसिनो व्यावसायिकांच्या व्यापारी परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा ठराव घेतला असून तो आपण मागे घेणे शक्यच नाही. आपण आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनीही मांडवीतून कॅसिनो हटविण्याची मागणी कायम सरकारसमोर ठेवली आहे. आम्ही कॅसिनो बंद करा, असे म्हणत नसून सदर जहाजे मांडवीतून अन्यत्र स्थलांतरीत करा, अशी मागणी करत आहोत, ही मागणी मागे घेतली जाणार नाही.