Tue, May 21, 2019 22:32होमपेज › Goa › टाकी-शेल्डे येथे अपघातात युवक ठार; अन्य दोन जखमी

टाकी-शेल्डे येथे अपघातात युवक ठार; अन्य दोन जखमी

Published On: Aug 17 2018 1:44AM | Last Updated: Aug 17 2018 1:44AMमडगाव : प्रतिनिधी

टाकी-शेल्डे येथे गुरुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटून दोन दुचाकींसह 4 वाहनांना मागून जोरदार धडक  बसल्याने  झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जुनेद इसरार कोरवाले (वय 21) हा युवक जागीच ठार झाला.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  स्विफ्ट डिझायर कारच्या  चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने दुचाकीसह चार वाहनांना मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की जुनेद आपल्या दुचाकीवरून रस्त्यावर फेकला गेला.  या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. डोक्यातून अधिक रक्‍तस्राव झाल्याने तो जागीच ठार झाला. या अपघातात कारचालक देवराजन मुरंगयसन आणि दुचाकीस्वार सुरेंद्र गावकर यांना जखमी अवस्थेत कुडचडे आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. जुनेद आपली फेजर मोटारसायकल घेऊन टाकी येथून तिळामळ येथे नव्याने  सुरू केलेल्या मोबाईल दुरुस्तीच्या दुकानाकडे जात होता. त्याच्या मागे देवराजन हा आपली स्विफ्ट कार घेऊन केपेच्या दिशेने जात होता.चिंचनगर ओलांडल्यावर अचानक भरधाव वेगात असलेल्या देवराजन याचा आपल्या गाडीवरील ताबा सुटला आणि त्याच्या गाडीचा धक्का थेट समोर असलेल्या जुनेद याच्या मोटरसायकलला बसला. या धडकेत जुनेद रस्त्यावर फेकला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. भरधाव स्विफ्ट गाडीने पुढे एकामागोमाग तीन अन्य वाहनांना धडक दिली. यात सुरेंद्र गावकर यांच्या फसिनो दुचाकीचा समावेश होता. त्यापुढे जाऊन स्विफ्ट गाडी एका होंडा सिटी कारवर आणि टाईल्स नेणार्‍या रिक्षावर आदळली. या धडकेत होंडा सिटी कारचे बरेच नुकसान झाले आहे. केपे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला.

कोरवाले कुटुंबावर आघात

जुनेद हा आई-वडिलांचा एकुलता एक  कमावता आधार आहे.  सहा महिन्यांपूर्वी त्याने तिळामळ येथे भाडेपट्टीवर दुकान घेऊन मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला होता.त्याच्या अचानक जाण्याने कोरवाले कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.त्याच्या मागे आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे.