Wed, Jun 03, 2020 07:58होमपेज › Goa › सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांचा निषेध : सावईकर

सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांचा निषेध : सावईकर

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 11:47PMपणजी : प्रतिनिधी
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे चालत आहे. सरकार अस्थिर करण्याच्या विरोधकांच्या   प्रयत्नांचा निषेध करण्याचा ठराव, प्रदेश भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत संमत करण्यात आला, अशी माहिती दक्षिण गोवा खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिली.

अ‍ॅड. सावईकर म्हणाले की, राज्यातील मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात युतीमधील घटक पक्ष व अपक्षांच्या मदतीने राज्यात अनेक विकासकामे साधण्यात आली. मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी देशाबाहेर असून त्यांच्या अनुपस्थितीतदेखील प्रशासनाचा कारभार सुरळीत सुरु आहे. राज्यातील विद्यमान सरकार अस्थिर करण्याच्या विरोधी पक्षांच्या धोरणांचा व प्रयत्नांचा  निषेध आहे. सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नांना यश येणार नाही. राज्याच्या विकासासाठी व प्रगतीसाठी राजकीय स्थिरता आवश्यक आहे. याबाबतचा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. खाणी बंद झाल्याने त्यावर अवलंबित असलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. खाणप्रश्‍नी भाजप हे जनतेबरोबर आहे. खाणप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार योग्य ती पावले उचलतील.

प्रदेश भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे म्हणाले की, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष  अमित शहा यांनी 13 मे रोजी गोव्यात येण्याचे मान्य केले आहे. यानिमित आयोजित केलेल्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सर्व 40 मतदारसंघांतील सुमारे 10 हजार कार्यकर्ते सहभागी होतील. मेळाव्यासाठी हे कार्यकर्ते बाईक रॅली काढतील. या संबंधित मतदारसंघाचा आमदार किंवा अध्यक्ष या रॅलीचे अध्यक्षपद भूषवतील. 

भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर म्हणाले की, भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ग्रामस्वराज अभियानावर चर्चा करण्याबरोबरच सामाजिक न्याय व सशक्‍तीकरणासंबंधातील ठराव संमत करण्यात आला. भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी मनपा नगरसेवक प्रमेय माईणकर यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मे महिन्यात पुन्हा गोव्यात परततील. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. त्यांनी आपल्याशी फोनवरून चर्चा केली आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.यावेळी आमदार नीलेश काब्राल, नेते अविनाश राय खन्‍ना उपस्थित होते.