Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Goa › मयेत बर्निंग ट्रेनचा थरार

मयेत बर्निंग ट्रेनचा थरार

Published On: Feb 28 2018 12:04AM | Last Updated: Feb 27 2018 11:53PMचोडण/मडगाव ः प्रतिनिधी

ट्रकांची वाहतूक करणार्‍या रो-रो रेल्वेला अचानक आग लागल्याने मुंबईकडे जाणार्‍या कोकण रेल्वेच्या अन्य गाड्या मंगळवारी संध्याकाळी दोन तास उशिरा सुटल्या. रेल्वे अधिकार्‍यांच्या माहितीनुसार थिवी ते करमळी दरम्यान एका ठिकाणी रेल्वेतील एका ट्रकच्या केबिनमध्ये मये येथे असताना आग लागून हळदणवाडी जंक्शन ते तिखाजन जंक्शनपर्यंत हा बर्निंग ट्रेनचा थरार मयेवासीयांनी अनुभवला. 

ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून ट्रकवरुन चालत जाऊन रेल्वे चालकाला घटनेची माहिती दिली व तिखाजन रेल्वे गेट ओलांडून पुढे आल्यावर आगीचे तांडव थांबविले. 

रो-रो रेल्वे पनवेल येथून सुटली होती. ती सोरलतक कर्नाटककडे जाणार होती. मंगळवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास थिवी स्थानकावरुन ती मार्गस्थ झाली. याचदरम्यान रेल्वेवरील चाळीस वाहनांपैकी मध्येच असलेल्या एका ट्रकच्या केबिनमध्ये हळदणवाडी येथे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. सदर ट्रकमध्ये लोखंडी प्लेट भरलेल्या होत्या. तर त्यापुढील ट्रकमध्ये डांबर भरलेले होते. आग लागताच चालकाने इतर ट्रकमधील पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आगीचा भडका अधिकच उडाला. आग आटोक्यात येत नाही, हे लक्षात येताच चालकाने अन्य ट्रकवरुन चालत जाऊन रेल्वे इंजिन चालकाला घटनेची माहिती दिली. तोपर्यंत गाडी तिखाजन गेटपर्यंत पोहोचली होती. गेट ओलांडल्यानंतर रेल्वे थांबवण्यात येऊन जळता ट्रक असलेला डबा वेगळा करण्यात आला. दरम्यान, डिचोली, जुने गोवे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणले. मात्र, तत्पूर्वी ट्रकचे केबिन पूर्णतया जळून खाक झाले होते. आग लागलेली रेल्वे सुमारे पंधरा किलोमीटर धावली. डिचोली अग्निशमन दलाचे चंद्रकांत मांडगावकर व जुने गोवेचे रोहिदास परब यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.