Mon, Apr 22, 2019 22:14होमपेज › Goa › ...इथे रोजच चुकतोय काळजाचा ठोका!

...इथे रोजच चुकतोय काळजाचा ठोका!

Published On: Feb 03 2018 2:25AM | Last Updated: Feb 02 2018 11:56PMफोंडा ः स्वप्नेश च्यारी  

आंबे धारबांदोडा येथील नदीवर पदपूल नसल्याने विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय होत आहे.  त्यामुळे या नदीवर पदपूल बांधावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.  पोफळीच्या झाडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या पुलांचा वापर लोकांना करावा लागत आहे.

पदपूल बांधण्याची प्रक्रिया अद्याप सरकारकडून सुरू न झाल्याने स्थानिकांना रोज जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते. सध्या नदीची पातळी ओसरल्याने नदी पार करण्यासाठी स्थानिकांनी पोफळीच्या झाडापासून पदपूल तयार केला आहे. परंतु या पदपुलावरून बालवाडीतील मुलांना घेऊन जाताना पालकांची नजर चुकल्यास मोठी दुर्घटना  घडण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात नदी पार करण्यासाठी होडीतून प्रवास करणारे आंबे गावातील लोक सध्या पाण्याची पातळी कमी झाल्याने पोफळीच्या झाडापासून तयार केलेल्या पदपुलावरून जातात. स्थानिक युवकांनी पोफळीच्या झाडापासून तयार केलेला पदपूल सक्षम जरी नसला तरी गावातील लोकांना ये-जा करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मात्र, दाबाळ येथील बालवाडीत जाणार्‍या लहान मुलांना याच पदपुलावरून नेताना पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी बालवाडीतून घरी जाताना एक मुलगा पाण्यात कोसळण्याची घटना घडली होती. परंतु त्यावेळी मुलाबरोबर असलेल्या आईने पाण्यात उडी घेऊन आपल्या मुलाला सुखरूप बाहेर काढले  होते. पावसाळ्यात होडीतून प्रवास करावा लागत असल्याने लहान  मुलांना बालवाडीत पाठवण्याचा धोका पालक पत्करत नाही. त्यामुळे मुलांना घरीच ठेवण्याची वेळ पालकांवर येते. 

आंबे-दाबाळ येथे नदीवर बंधारे उभारून पदपूल बांधण्याची घोषणा आजपर्यंतच्या प्रत्येक स्थानिक आमदारांनी केली आहे. त्यामुळे आंबे गावातील लोक आश्‍वासनांना भुलून प्रत्येकवेळी मतदान करतात. परंतु निवडणूूक संपल्यानंतर आंबे गावाचा प्रश्‍न सोडविण्यात कुणीच रस दाखवीत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

शांताराम गावकर यांनी सांगितले, की पदपूल बांधण्यासाठी कायदेशीर सोपस्कार सुरु असल्याचे गेल्या कित्येक वर्षांपासून ऐकू येत आहे. परंतु आजपर्यंत पदपूल बांधण्याची प्रक्रिया सुरु झाली नाही. निदान बालवाडी, शाळेच्या मुलांसाठी सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्यावेळी गावात कुणी आजारी पडल्यास रुग्णाला उचलून घेऊन नदी पार करावी लागते. आंबे येथून मुख्य रस्ता गाठण्यासाठी 4 किलोमीटरचे अंतर ओलांडावे लागते. गावातील युवकांनी स्वतः पोफळीच्या झाडाच्या साहाय्याने पदपूल उभारला आहे. धारबांदोडा पंचायतीने यासाठी आर्थिक मदत केली आहे. 

मंजुळा सुर्लीकर या सत्तर वर्षीय महिलेने सांगितले,की आपण आजारी असल्याने सतत नदी पार करून  डॉक्टरकडे जावे लागते. पदपुलावरून थरथरत जाताना नदीत कोसळण्याचा धोका अधिक आहे. सरकारने या भागातील लोकांच्या जिवाकडे खेळण्यापेक्षा याठिकाणी बंधारे उभारून पदपुल उभारण्याची गरज आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पदपुल बांधण्यासाठी पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही कारणाने पायाभरणीचा कार्यक्रम अजून झालेला नाही. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने आंबे येथील पदपूल बांधण्यासाठी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.