Wed, Nov 14, 2018 08:48होमपेज › Goa › समुद्र खवळला; सासष्टीत विविध शॅक्सची हानी

समुद्र खवळला; सासष्टीत विविध शॅक्सची हानी

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:34AMमडगाव ः प्रतिनिधी

हंगाम संपत आलेला असल्याने शॅक मालकांनी आपापले शॅक हटवण्याचे काम हाती घेतलेले असतानाच  रविवारी (दि.22) अचानक समुद्र खवळल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होऊन 5-6 मीटर उंचीच्या मोठ्या लाटा किनार्‍यावर येऊन आदळल्याने सासष्टीत असंख्य शॅक्सची हानी झाली.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण तसेच गोव्याच्या किनारपट्टी भागात दोन ते तीन मीटर उंचीच्या मोठ्या लाटा उठतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. पर्यटन हंगाम संपत आल्याने दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्याच्या किनारपट्टी भागातील शॅक मालकांनी आपापली शॅक किनार्‍यावरून हटवणे सुरू केले होते. त्यातच रविवारी सायंकाळी अचानक समुद्राच्या पातळीत वाढ होऊ लागली, त्यामुळे बरेचसे लाकूडसामान आदी साहित्य पाण्याबरोबर वाहून गेले. मोबोर येथे पाणी शॅकच्या किचनपर्यंत पोचले होते. 

मोबोर येथील शॅक मालक कोलेनॉल फेर्नांडिस यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, अचानक पाण्याची पातळी वाढल्याने साहित्य वाचवता आले नाही. ‘फूल मून’च्या वेळी पाण्याची पातळी वाढली होती, पण यावेळी पाण्याच्या पातळीत गेल्यावेळच्यापेक्षाही पाच सहा मीटर्सनी वाढ झाली. या परिसरातील पाच शॅक्सची अवस्था अशीच झाल्याचे ते म्हणाले.

समुद्र खवळल्याने वार्का, झालोर तसेच बाणावली समुद्र किनार्‍यावर  जीवरक्षकांनी पर्यटकांना पाण्यात न उतरण्याची सूचना दिली होती.तरीही रविवारी मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक कोलवा किनार्‍यावर दाखल झाले होते. अनेकजण दारूच्या नशेत ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र होते.