Sat, Mar 23, 2019 12:33होमपेज › Goa › छ. शिवाजी, संभाजींच्या कार्यात जिजाऊंचा वाटा मोलाचा

छ. शिवाजी, संभाजींच्या कार्यात जिजाऊंचा वाटा मोलाचा

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:32PM

बुकमार्क करा

पेडणे ः प्रतिनिधी 

 भारतवर्षातील लोक जसे छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू शकत नाहीत, तसे त्यांचे सुपुत्र संभाजी महाराजांनाही विसरणे अशक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे  या पिता-पुत्रांच्या  अलौकिक कार्यात माता जिजाऊंचा मोठा वाटा आहे.भारतीय संस्कृती  जतन करण्यासाठी जिजामातेसारख्या स्त्री शक्तीच्या विचारांची आज गरज आहे,असे प्रतिपादन  राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केले.
 पेडणे भगवती हायस्कूलच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पेडणे सावळवाडा मैदानावर धर्मवीर संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित महानाट्याचे   उद्घाटन केल्यानंतर राज्यपाल त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर  डॉ.रामकृपाल सिन्हा, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक,जित आरोलकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे,  पेडणे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर, उत्तम कोटकर, , महानाट्याचे  संयोजक प्रदीप सावंत, शंभू राजेच्या लेखिका निलागीं शिंदे, नेपथ्य व दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक व्ही एम प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल    पुढे म्हणाल्या की,आपला इतिहास  नाटकाच्या माध्यमातून मुलांसमोर आणून भगवती शिक्षण संस्थेने कौतुकास्पद कार्य केले आहे.पेडणे भगवती हायस्कूलने यापुढेही असेच भव्यदिव्य कार्य करत रहावे.

शंभू राजांच्या जीवनावर आधारित   या महानाट्यात एकूण 520 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तसेच घोडे , बैलगाड्याचांही त्यात  सहभाग होता.   दहा हजाराहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावून या महानाट्याचा  आनंद घेतला. भगवती संस्थेचे पदाधिकारी उत्तम कोटकर, विनोद मेथर, प्रदीप सावंत, लेखिका निलागीं शिंदे, दिग्दर्शक जयेंद्रनाथ हळदणकर यांचा राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले,की शंभू राजेंनी अवघ्या 33 वर्षाच्या वयात   यवनी साम्राज्य मोडून काढले.शिवबांनी   सुराज्य निर्मितीसाठी घराघरातून समर्थ  मावळे तयार केले.पाठीचा कणा ताठ असतो तेच इतिहास घडवू शकतात याचा प्रत्यय दिला. तर विरोधकांनी  शंभूना रगेल आणि रंगेल या प्रतिमेत अडकवून ठेवले ,  तो इतिहास कसा चुकीचा होता हे समजून घेण्याची गरज आहे.

एकही लढाई न हरणार्‍या शंभूराजेंचे महानाट्य सादर केल्याबद्दल भगवती शिक्षण संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले,की शंभूराजांचे चरित्र युवापिढीच्या मनावर बिंबवले तर गोवा व पर्यायाने भारताचे गौरवशाली चित्र समोर येईल. स्वागत मुख्याध्यापक केशव पणशीकर यांनी केले.परिचय श्रद्धा गवंडी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. पौर्णिमा केरकर यांनी केले.  प्रदीप सावंत यांनी आभार मानले.