Fri, Jul 19, 2019 20:06होमपेज › Goa › गोमांस विक्रेत्यांचा बंद मागे

गोमांस विक्रेत्यांचा बंद मागे

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:37AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

परराज्यातून   गोमांसाची  गोव्यात कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून केली जाणारी वाहतूक अडवली जाणार नाही. गोमांस वाहतुकीत प्राणी मित्र एनजीओ अडथळा आणणार नाहीत, जर आणलाच  तर  पोलिस संरक्षण दिले जाईल, या सरकारच्या आश्‍वासनानंतर मागील चार दिवसांपासून सुरू असलेला गोमांस विक्रेत्यांचा बंद मागे घेण्यात आल्याचे कुरेशी मांस विक्रेते  संघटनेचे अध्यक्ष मन्‍ना बेपारी यांनी  पणजीत पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील  बाजारपेठेत बुधवार (दि. 10) पासून गोमांसाचा पुरवठा  पुन्हा सुरू होईल. चार दिवसांच्या बंदमुळे राज्यभरातील गोमांस विक्रेत्यांचे 1 कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

बेपारी म्हणाले, आमचा एनजीओंना विरोध नाही. मात्र, कायदेशीरपणे होणारी वाहतूक अडवू नये. गोमांसाची वाहतूक कायदेशीर की बेकायदेशीर हे तपासण्याचे काम पोलिस व पशुचिकित्सकाचे आहे. मात्र एनजीओंकडून यात हस्तक्षेप केला जातो.  गोमांसप्रश्‍नी  6 रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी दोन दिवसांत तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार  सरकारने  दिलेल्या आश्‍वासनानंतर गोमांस विक्रेत्यांचा बंद मागे घेण्यात आला आहे. गोव्यात दरदिवशी 20 ते 25 टन गोमांसाची आवश्यकता भासते.  मात्र, एनजीओंकडून गोमांस वाहतूक  अडवण्याच्या प्रकारामुळे कर्नाटक येथील पुरवठदार धास्तावले असल्याने  काही दिवस तरी गोमांसाचा आवश्यकतेपेक्षा  कमी पुरवठा होईल.

एनजीओंकडून परराज्यातून आणल्या जाणार्‍या गोमांस वाहतुकीत  अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर  पुन्हा बंद पुकारण्याशिवाय पर्याय नसेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.