Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Goa › शुल्कवाढीमुळे उद्योजक-कॅसिनो मालकांत नाराजी

शुल्कवाढीमुळे उद्योजक-कॅसिनो मालकांत नाराजी

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 11:34PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमधील भूखंडाच्या वार्षिक दरात व कॅसिनोंच्या शुल्कातही दरवाढ झाल्याने उद्योजक आणि कॅसिनो मालकांत नाराजी पसरली आहे. सरकारने सदर दरवाढ मागे घ्यावा. तसे न केल्यास उद्योग-व्यवसाय बंद करण्याचा इशारा व्यावसायिकांनी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोवा औद्योगिक विकास महामंडळ उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड देते. या भूखंडधारकांशी लिज करार केला जातो. उद्योजक वार्षिक ठराविक भाडे औद्योगिक विकास महामंडळाकडे जमा करतात. मात्र, सर्व औद्योगिक वसाहतीमध्ये भाडेदरात समानता आणण्याच्या नावाखाली महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेदर नव्याने निश्‍चित केला आहे. भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार भाडेदर ठरविला गेला आहे.

राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या संघटनांनी या भाडेदर वाढीबद्दल गोवा औद्योगिक विकास महामंडळावर नाराजी व्यक्त केली आहे. 20 ते 30 टक्के भाडेवाढ करताना सरकारने विश्‍वासात घेतले नाही, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. आपल्याला हा दर परवडणार नाही, असे खास करून छोट्या उद्योजकांचे म्हणणे आहे. ‘ गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज ’या संघटनेच्या झेंड्याखाली हे सगळे उद्योजक आता संघर्षासाठी एकत्र आले आहेत. त्यांची बैठकही चेंबर ऑफ कॉमर्सने बोलावली आहे. 

गोव्यात एकूण 20 औद्योगिक वसाहती आहेत. वेर्णा, कुंडई, डिचोली, पिसुर्ले- सत्तरी, होंडा, तुयें, मडकई अशा काही महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींमध्ये मोठे आणि नावाजलेले उद्योग आहेत. टेल्कोपासून सिप्ला, डि-लिंक व अन्य उद्योगांनी गोव्यातील हजारो व्यक्तींना रोजगार संधी दिल्या आहेत. 

दुसर्‍याबाजूने, राज्यातील ऑन शोअर आणि ऑफ शोअर कॅसिनोंसाठीच्या शुल्कात सरकारने 4 ते 5 पट्टीने वाढ केल्याने कॅसिनो व्यावसायिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. सदर शुल्कवाढ मागे घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या काही मंत्र्यांवर दबाव आणण्याचे कामही कॅसिनो लॉबीने केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कॅसिनो शुल्कवाढ  अशंत: मागे घेण्यात येण्याची संभावना असल्याचे सूत्रांनी सांगितले.