Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › बसुराज खून प्रकरण : संशयित आदित्य, कल्पनाचे रक्‍ताळलेले कपडे हस्तगत

बसुराज खून प्रकरण : संशयित आदित्य, कल्पनाचे रक्‍ताळलेले कपडे हस्तगत

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 12:44AMमडगाव ः प्रतिनिधी

बसुराज बाकडीच्या मृतदेहाचे तुकडे अनमोड घाटात फेकल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मुख्य संशयित आदित्य गुज्जर (वय 19) याने पोलिसांना आस्तेमळ (कामराळ, कुडचडे) येथे लोकवस्तीजवळ मातीत पुरून ठेवलेला त्याचा रक्‍ताने माखलेला शर्ट आणि मृताची पत्नी कल्पना बाकडी हिचा चुडीदार सोमवारी पोलिसांना दाखवला. गुज्जरने दिलेल्या माहितीवरून कुडचडे पोलिसांनी अस्तेमळ येथून दोघांचे कपडे आणि एक कटर हस्तगत केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य गुज्जर याला कुडचडे पोलिसांनी रविवारी (दि.20) गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथून ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून या खुनासंदर्भातील महत्वपूर्ण माहिती पोलिसांना प्राप्त झाली. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या कल्पनाने बसुराजचा खून करण्यापासून ते त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यापर्यंत सर्व कामात आदित्यचा मुख्य सहभाग होता, अशी माहिती पोलिसांना दिली होती. गुज्जर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

बसुराज याचा 2 एप्रिल रोजी खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी भाजी चिरण्याची विळी आणि थर्मोकोल कापण्याचा कटर वापरण्यात आला होता. कुडचडे पोलिसांनी इतर संशयितांकडून ती विळी आणि कटर जप्त केला होता. आदित्यची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना सांगितले की, मृतदेहाचे तुकडे करताना आपल्या आणि कल्पना बाकडी हिच्या कपड्यांना रक्‍त लागले होते. अनमोड घाटात मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर इतर पुरावे नष्ट करण्यासाठी आपण रक्‍ताने माखलेले दोघांचे कपडे आणि कटर घेऊन अस्तेमळ येथे आलो. अस्तेमळ येथे शेवटचे घर ओलांडल्यानंतर कच्च्या रस्त्याने पुढे आलो आणि रस्त्याच्या बाजूला खड्डा खणून त्यात आपला शर्ट आणि कल्पनाचा चुडीदार पुरला.

आदित्य गुज्जरला घेऊन पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई सहकार्‍यांसह सोमवारी अस्तेमळ येथे दाखल झाले.त्याने दाखवलेल्या जागी पोलिसांना मातीत पुरलेले कपडे आढळून आले.शर्टाच्या खिशात एक कटरही सापडला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी दिली.

‘उसे काटा तब होश नही था’

‘उसे काटा तब मैं होश में नही था, शायद किसीने मुझे कुछ खिलाया होगा’, असे आदित्य यावेळी पुटपुटत होता. खुनाच्या कृत्याचा त्याच्या चेहर्‍यावर कोणताच पश्‍चाताप दिसत नव्हता, असे पोलिसांनी सांगितले.