Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Goa › काँग्रेसतर्फे थिवी, म्हापशात स्वस्तात नारळ विक्री

काँग्रेसतर्फे थिवी, म्हापशात स्वस्तात नारळ विक्री

Published On: Jan 21 2018 2:45AM | Last Updated: Jan 21 2018 2:27AMबार्देश/ थिवी : प्रतिनिधी
राज्यात नारळांच्या किमती गगनाला भिडल्या असून त्या नियंत्रणात आणण्यास सरकारला अपयश येत आहे.  या पार्श्‍वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी शुक्रवारी थिवी व म्हापसा बाजारपेठेत  स्वस्तदरात 10 ते 15  रुपयांनी नारळांची विक्री करून सरकारच्या कृतीचा निषेध केला.    म्हापसा पालिका बाजारपेठेत स्वस्तात नारळ विक्री प्रसंगी  बोलताना   प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा प्रतिमा कुतीन्हो म्हणाल्या, की  कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी गोवेकरांना कमी किंमतीत नारळ उपलब्ध करून द्यायला हवे होते.

नारळाच्या वाढत्या दरांवर सरकारने नियंत्रण ठेवणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. नारळ गोमंतकीयांच्या रोजच्या गरजेचा असून तो स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे.   नारळाचे दर भरमसाठ वाढले असून 40 ते 50 रुपयांनी विकले जात आहेत. स्वस्तात नारळ देण्यासाठी सरकारने  व्यावसायिकांसाठी   कोणतीच योजना आखली नाही असा असे कुतिन्हो  म्हणाल्या.  

 शुक्रवारी म्हापसा आठवडा बाजाराच्या दिवशी  प्रदेश  काँग्रेस महिलांतर्फे 10 व 15 रूपयांना प्रतीनग नारळ विक्री करण्यात आली.  यावेळी कुतिन्हो यांच्यासमवेत माजी जिल्हा पंचायत सदस्य  डायना ब्रागांझा, उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, सुदिन नाईक, प्रिया राठोड, सोनिया मांद्रेकर, महिला अध्यक्ष उत्तर गोवा मिताली गडेकर, अनुसया कांबळी, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. मिताली गडेकर  म्हणाल्या, भाजप सरकारने लोकांचे जिणे खडतर केले आहे. त्यांना या महागाईमुळे जगणे मुश्कील झाले आहे.

आज  नारळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवून ते 40 रूपयांपयर्ंत पोहोचले.ते लोकांना घेणे शक्य होत नाही. गोव्यातील लोकांना जेवणासाठी नारळ लागतो. सरकारने यावर तोडगा काढावा.  थिवी  प्राथमिक उपआरोग्य केंद्राजवळ स्वस्त दरात नारळाची विक्री करण्यात आली. नारळाची विक्री प्रसंगी प्रदेश  काँग्रेस महिला अध्यक्ष  प्रतिमा कुतिन्हो, थिवी सरपंच तृप्ती शिंदे, डायना ब्रागांझा, थिवी गट काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.