Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Goa › गणेशपुरी म्हापसा  क्रीडा  मैदान वापराविना

गणेशपुरी म्हापसा  क्रीडा  मैदान वापराविना

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:48AM

बुकमार्क करा
बार्देश  : प्रतिनिधी

गणेशपुरी-म्हापसा येथे गेल्या एक ते दीड वर्षांपूर्वी सुडातर्फे सुमारे तीन कोटी रूपये खर्च करून सर्व सुविधायुक्त  क्रीडा मैदान बांधण्यात आले आहे. मात्र, या क्रीडा मैदानाचा वापर खेळण्यासाठी होत नसल्याने युवा खेळाडू नाराज आहेत. गणेशपुरी येथील क्रीडा मैदान सर्वसामान्य युवक, शाळांतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी दिले जात होते. त्यावेळी हे क्रीडा मैदान सर्वांसाठी खुले होते. त्यावेळी मात्र विशेष सुविधा नव्हत्या.

मात्र, आता या मैदानासाठी एक ते दिड वर्षापूर्वी सुडातर्फे सुमारे तीन कोटी खर्च करून मैदानाची सुधारणा करण्यात आली आहे. स्वच्छतागृहासह,  छोटेखानी कार्यक्रमासाठी व्यासपीठ, हिरवेगार मैदान, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र, याचा वापर युवकांना खेळण्यासाठी करु दिला जात नसल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मैदानाचा वापर सभा घेण्यासाठी केला जातो, असे काही युवा खेळाडूंचे म्हणणे आहे. खेळाडूंनी क्रीडा मैदान खेळण्यास मागितले असता त्यावर खड्डे पडतील, असे त्यांना सांगण्यात येते. या मैदानाबाबत  काही युवकांनी स्थानिक नगरसेवकांकडेही मागणी केली होती. मात्र,  त्यावर काहीच झाले नाही. युवकांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने खेळण्यासाठी कुठे जावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  संबंधितांनी क्रीडा मैदान खुले करावे, अशी मागणी खेळाडूंतून होत आहे.