Tue, Nov 19, 2019 13:13होमपेज › Goa › शिवोली-खैराट रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा

शिवोली-खैराट रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा

Published On: Jul 12 2019 1:46AM | Last Updated: Jul 12 2019 1:46AM
शिवोली : प्रतीनीधी

शिवोली ते खैराट ओशेलपर्यंत जलवाहिनी घालण्यासाठी खोदलेला रस्ता खचल्याने रस्त्याची दुर्दशा  झाली असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असून  वाहनचालकांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहेत. रस्ता दुरूस्तीबाबत त्वरीत उपाययोजना केली जाईल, अशी  ग्वाही ओशेल सरपंच वंदना नार्वेकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.

सरपंच नार्वेकर म्हणाल्या, की पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत चालू असलेल्या तिळारी पाणी प्रकल्पाच्या जलवाहिनीचे काम गेल्या डिसेंबरपासून  शिवोली येथे चालू आहे. शिवोली ते खैराट पर्यंत रस्ता खोदून  जलवाहीनी टाकण्यात आली आहे. हे काम पाऊस सुरू होईपर्यंत चालू होते.  जलवाहिनी घालण्यासाठी खोदलेला रस्ता बुजवून त्यावर डांबरीकरण करण्यात आले. परंतु कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे खोदलेला रस्ता दगड टाकून न बुजवता केवळ माती टाकून बुजविण्यात आला. त्यावर खडी टाकून डांबरीकरण केले. पाऊस लागल्यानंतर भरावासाठी घातलेली माती दबली असून  संपूर्ण रस्ता खचून धोकादायक बनला आहे. रस्ता खचून खडी वर आल्यामुळे दुचाकीस्वार घसरुन पडत आहेत. स्थानिकांनी सध्या खड्डयामध्ये दगड टाकले  आहेत. हा रस्ता ओशेल ते शिवोली परिसरातील लोकांना महत्त्वाचा असून तो दुरूस्त करण्यासाठी कंत्राटदाराला आदेश दिले आहेत.

शिवोली ते आराडी ओशेल खैराटपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक  बनला असल्याचे खैराट येथील काही महिला दुचाकीस्वारानी निदर्शनास आणून दिले. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली त्यांनी केली होती. आपण जलस्त्रोत खात्याच्या कंत्राटदाराशी संपर्क साधून उपाययोजना करण्यास सांगितले आहे. लवकरच कंत्राटदाराकडून उपाययोजना केली जाईल, असे सरपंच नार्वेकर यांनी सांगितले. 

शिवोली  ते खैराटपर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट बनली असून या परिस्थितीला कंत्राटदार  जबाबदार आहे. कामाचे योग्य नियोजन न करता पाऊस पडल्यानंतरही काम केले.पावसात रस्ता डांबरीकरण केले जात नाही  कंत्राटदाराने ते काम केले.त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. या मार्गावरुन दररोज शेकडो वाहने ये-जा करतात. खासकरुन दुचाकीस्वारांना हा मार्ग अतिशय धोकादायक बनला असल्याचे सुहास नाईक यांनी सांगितले. 

जलवाहिनी घालण्यासाठी शेळ शिवोली ते खैराटपर्यंत  तीन किलोमीटर लांब  व दोन मीटर खोल रस्ता खोदण्यात आला.  खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजविला नसल्यामुळे तो खचला आहे.   रस्ता खचल्यानंतर पुन्हा डागडुजी करण्याचे काम कंत्राटदाराचे आहे.ते काम त्याने अजून  केले  नाही. कंत्राटदाराने त्वरीत खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी.पावसाळा संपल्यानंतर हॉटमिक्स पद्दतीने डांबरीकरण करण्याची गरज आहे, असे अरविंद नाईक म्हणाले.  

जलवाहिनी टाकणार्‍या कंत्राटदाराने योग्य खबरदारी न घेतल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. तसेच  शेतातून जलवाहिनी टाकताना योग्य उपाययोजना न केल्याने शेतात ओहोळ निर्माण झाले आहेत.यामुळे शेतीवरही परिणाम होऊ शकतो, असे श्रीराम हरमलकर यांनी सांगितले.