Tue, May 21, 2019 01:05होमपेज › Goa › मुरगाव येथील माजी नगराध्यक्ष होन्नावरकरवर जीवघेणा हल्ला

मुरगाव येथील माजी नगराध्यक्ष होन्नावरकरवर जीवघेणा हल्ला

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 11 2018 12:00AMदाबोळी : प्रतिनिधी

हेडलॅण्ड सडा येथील रहिवाशी तथा मुरगावचे माजी नगराध्यक्ष रामा होन्नावरकर (वय 66) यांच्यावर नीलेश होन्नावरकर याने चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी होन्नावरकर यांची प्रकृती चिंताजनक  असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संशयित नीलेश होन्नावरकर याला मुरगाव पोलिसांनी अटक केली.

मुरगावच्या  पोलिस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 9.30 वा. हेडलॅण्ड सडा येथील रामा होन्नावरकर आपल्या स्कूटीवरुन वास्को मार्केटकडे जात होते. ते सडा येथे मुख्य नाक्यावर पोहोचले असता संशयित निलेशने  रामा यांना अडवून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. रामा होन्नावरकर यांच्या हाताला तसेच छातीत चाकूचा घाव वर्मी लागल्याने   तेे रक्तबंबाळ होऊन तिथेच कोसळले.   संशयित नीलेशने लोक जमा होत असलेले बघून तेथून पळ काढला. यावेळी जमलेल्या लोकांनी रामा यांना 108 रुग्णवाहिकेतून तातडीने चिखली कुटीर रुग्णालयात दाखल केले. नंतर तेथून  अधिक उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची स्थिती नाजूक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नीलेश होन्नावरकर हा रामा होन्नावरकर यांचा शेजारी असून पूर्व वैमनस्यातून हा  हल्ला झाल्याचा कयास  पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयित नीलेश विरोधात अनंत रामा होन्नावरकर यांनी तक्रार दाखल केली असून संशयिताला मुरगाव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.