Tue, Jun 18, 2019 19:29होमपेज › Goa › सभागृह नेतेपदी सुदिन ढवळीकर

सभागृह नेतेपदी सुदिन ढवळीकर

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारपणामुळे अधिवेशनाला  उपस्थित राहू शकत नाहीत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना सभागृहाचे नेते म्हणून भाजप विधिमंडळ गटाने सोमवारी मान्यता दिली. 

भाजप आमदारांची बैठक सोमवारी सकाळी पर्वरी येथील मुख्यमंत्र्यांच्या कक्षात झाली. या बैठकीत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीची माहिती आमदारांना देण्यात आली. ते अधिवेशनाला येऊ शकणार नाहीत, याचीही कल्पना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक व सरचिटणीस सदानंद तानावडे  यांच्यासह सर्व भाजप आमदार उपस्थित होते.  
बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांना सांगितले की, ढवळीकर हे पर्रीकर मंत्रिमंडळातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस अधिवेशनात तेच सभागृहाचे नेते असतील. मात्र, भाजपचे विधिमंडळ गटनेते म्हणून  मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे काम पाहणार आहेत.

भाजपप्रणीत सत्ताधारी आघाडीचीही बैठक सोमवारी पार पडली. मंत्री ढवळीकर हे सभागृहात नेते म्हणून काम पार पाडतील हे यावेळी मान्य करण्यात आले. उपसभापती मायकल लोबो या बैठकीनंतर म्हणाले की, मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे असलेल्या वित्त, गृह, खाणी आदी खात्यांसंबंधात कोणतेही प्रश्‍न अधिवेशनात घेतले जाणार नाहीत. मंत्री ढवळीकर हे सभागृहाचे नेते असले तरी ते पर्रीकर यांच्या खात्यावर माहिती देऊ शकत नाहीत. मात्र, उर्वरीत मंत्र्यांकडील खात्यांवरील प्रश्‍न कामकाजात घेतले जाणार आहेत.