Thu, Jun 27, 2019 18:00होमपेज › Goa › विशेष मुलांसाठी योेजनांची तरतूद करणार 

विशेष मुलांसाठी योेजनांची तरतूद करणार 

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:05PMडिचोली : प्रतिनिधी

विशेष मुलांना सुविधा पुरवण्यासाठी प्राधान्य देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. आगामी काळात या मुलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची  तरतूद करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

डिचोली येथील केशव सेवा साधना संचालित नारायण झांट्ये विशेष मुलांच्या शाळेच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष सागर शेट्ये, आमदार राजेश पाटणेकर, खगेेंद्र हेडगे देसाई, मुख्याध्यापिका संजना प्रभूदेसाई आदी उपस्थित होत्या. 

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की  मुलांमधील व्यंग हे दुःख न समजता परमेश्‍वराने असा मुलांची सेवा करण्याची दिलेली संधी समजून शिक्षक व पालकांनी या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत राहावे.  

विशेष मुलांची संख्या वाढत आहे. परंतु समाजात आजही चांगुलपणा  असल्याने अनेक मंडळी अशा प्रकारच्या संस्था चालवण्यास तत्परता दाखवत आहेत. व्यंगावर मात करुन या विशेष मुलांनी क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर यश मिळविलेले आहे ही अभिमानाची बाब असून या मुलांच्या भवितव्यासाठी अनेक नवनवीन योजना राबवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री  पर्रीकर यांनी   सांगितले. अशा मुलांची सेवा करण्यासाठी पैसा नव्हे तर अंत:करणातून सेवाभाव जागृत व्हावा लागतो ते कार्य गोव्यात चालू असून सामाजिक बांधिलकीची भावना जपताना या विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षकांनी मुलांना आपलेस करुन त्यांना जीवनात उभे करण्याचा प्रयत्न व्हावा.  काम  रोजगार म्हणून  नव्हे तर कार्तव्य भावनेने कार्य करावे.   या शाळेसाठी काहीच कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सागर शेट्ये यांनी शाळेच्या योजनांची माहिती दिली. संजना प्रभूदेसाई यांनी वार्षिक अहवाल सादर केला. मुलांनी संचलन करुन मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली.  क्रीडा ध्वज फडकवून व क्रीडा ज्योत प्रज्वलित करुन क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले.