Fri, Apr 26, 2019 19:34होमपेज › Goa › चित्रपटांतील भूमिकांमुळे समाजात महिलांचा दरारा

चित्रपटांतील भूमिकांमुळे समाजात महिलांचा दरारा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मागील शंभर वर्षांत भारतीय चित्रपटांत महिलांना अनेक भूमिकांत दाखविण्यात आले. महिलांच्या चित्रपटातील भूमिकांना बांधून ठेवण्यापासून ते त्यांच्यावर मर्यादा लादण्यापर्यंत सर्व प्रकार चित्रपटातून लोकांपर्यंत पोचले. मात्र, मागील काही वर्षांत महिलांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या चारित्र्याचाही विचार न करता मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे समाजात महिलांचा दरारा वाढतो आहे, असे मत प्रसिध्द अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी व्यक्त केले. 

इफ्फीत आयोजित मास्टरक्लासमध्ये अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. भूमी म्हणाल्या, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभिनय विषयात नापास झाले होते. त्यामुळे आपण जर का अभिनेत्री होऊ शकते तर कुणीही या क्षेत्रात जिद्दीने सफल होऊ शकते. 

चित्रपट क्षेत्रात महिलांच्या भूमिकांमध्ये क्रांती दिसून येत आहे. पूर्वी साकारली जाणारी आई, बहीण, प्रेयसी, मैत्रीण या भूमिकांना बंधने असायची. मात्र, आता हे सर्व बाजूला सारून अभिनेत्रींनी स्वत:ची अशी वेगळी ओळख चित्रपटांमधून मांडली आहे. 

चित्रपटातील भूमिकांमधून समाजात बदल होतात. त्यामुळे महिलांचे चित्रपटात बदलते स्वरूप पाहता समाजातही बदल होईल, असा विश्‍वास वाटतो. आपल्या अभिनयातून असेच बदल समाजात घडवायचे आहेत, असे भूमी यांनी सांगितले.

‘जोर लगा के हैश्या...’ या चित्रपटातून भूमी पेडणेकर या अभिनेत्रीने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ व ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांसह भूमीचे आतापर्यंतचे सर्वच चित्रपट हिट झाले आहेत. सध्या भूमी आपल्या अभिनयामुळे सर्वांची लाडकी व आवडती अभिनेत्री बनली आहे.