Fri, Jul 19, 2019 07:34होमपेज › Goa › नियम मोडणार्‍या शॅक्स चालकांवर कारवाई

नियम मोडणार्‍या शॅक्स चालकांवर कारवाई

Published On: Mar 03 2018 1:50AM | Last Updated: Mar 02 2018 11:41PMपणजी : प्रतिनिधी

 शॅक्स  धोरणाचे उल्‍लंघन  करून गोव्याच्या पर्यटनाची बदनामी  करणार्‍या शॅक्सचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाारा पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी शुक्रवारी दिला. पर्यटन खाते तसेच गोवा पोलिसांना यासंबंधी कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.  बागा,सिकेरी किनार्‍यावरील   शॅक्स चालकांकडून  नियमांचे पालन होत नसल्याने   मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी तेथील स्थानिकांनी  आजगावकर यांच्याकडे  केल्या होत्या. स्थानिकांच्या तक्रारींना अनुसरून  पर्यटनमंत्र्यांनी उपरोक्त इशारा दिला.  पर्यटन हंगामात किनार्‍यांवर उभारण्यात येणार्‍या शॅक्सना वेळेची मर्यादा घालून  देण्यात आली आहे.

मात्र वेळ मर्यादेनंतर देखील  सदर शॅक्स रात्रीच्या वेळी  बेकायदेशीरपणे  सुरू ठेवले जात असल्याने किनार्‍यांवर जाणार्‍या स्थानिकांना विनाकारण मनस्ताप  सहन करावा लागतो. या गोष्टी  राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने योग्य नसल्याने  संबंधितांवर कारवाई करून  हे प्रकार सरकारने  रोखावेत,अशी मागणी  बागा, सिकेरी येथील स्थानिकांकडून करण्यात आली होती.  या मागणीची गंभीर दखल पर्यटन मंत्री आजगावकर यांनी घेतली.  

ते म्हणाले,  शॅक्स चालकांकडून  होणारे उल्‍लंघन  तसेच  पर्यटन खात्याच्या कर्मचार्‍यांकडून  अशा  गोष्टींवर   योग्य वेळी तोडगा न काढणे ही बाब खपवून घेतली जाणार नाही.  पर्यटनाशी संबंधित विविध प्रकारांवर  कडक देखरेख गरजेची असून ती केवळ  उत्तर गोव्यातच नव्हे,तर राज्यातील  संपूर्ण किनारी पट्टयात आवश्यक आहे. गोवा पोलिसांनी किनारी भागांमध्ये चालणार्‍या  अशा बेकायदेशीर प्रकार रोखण्यासाठी  संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी. कायदा मोडणार्‍यांवर कारवाई होणारच, असेही आजगावकर यांनी स्पष्ट  केले.