Mon, Nov 19, 2018 09:31होमपेज › Goa › तीन पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार 

तीन पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार 

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 11:43PMमडगाव ः प्रतिनिधी

 ड्यूटी सोडून अन्यत्र गेलेल्या अन् चक्क पोलिस अधीक्षकांनाच न ओळखता  त्यांना दुरूत्तरे केलेल्या तीन पोलिस शिपायांवर सध्या निलंबनाची तलवार लटकत आहे. ड्यूटी अर्ध्यावर सोडून दारूच्या नशेत बुधवारी ऑम्लेट पाव खाण्यासाठी गेलेल्या राखीव दलातील तीन शिपायांविरुद्ध अहवाल फातोर्डा पोलिसांनी गुरूवारी पोलिस अधीक्षकांना सादर केला आहे.

राखीव दलातील तीन पोलिसांना नुकतेच नामकरण झालेल्या जनमत कौल सर्कल ते कोलवा सर्कल आणि रवींद्र भवन सर्कलपर्यंत ड्यूटीवर तैनात करण्यात आले होते. या पोलिसांनी रात्रीच्या वेळी कोणी अधिकारी तपासणीसाठी येणार नाही, अशा समजुतीने संधी साधून भरपूर दारू ढोसली.आणि ड्यूटी अर्ध्यावर सोडून मडगावात रुचकर ऑम्लेट पावसाठी ओळखल्या जाणार्‍या भास्कर यांच्या गाड्यावर ते तिघे रसऑम्लेट खाण्यासाठी निघून गेले. नेमके त्याचवेळी दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस जमनत कौल सर्कलजवळ राउंडसाठी आले असता त्यांना एकही पोलिस ड्यूटीवर आढळून आला नाही.

वरील तिघेजण गाड्यावर ऑम्लेट पाव खाण्यात व्यग्र असताना पोलिस अधीक्षक त्या ठिकाणी गेले आणि तुम्ही ड्यूटी सोडून काय करता, असा त्यांना प्रश्‍न केला. त्यावर दारूच्या नशेत तर्र असलेल्या या पोलिसांना अधीक्षकांना ओळखता आले नाही. ऑम्लेट खातो हे तुला दिसत नाही काय, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी अधीक्षकांना केला. अधीक्षक गावस यांनी त्वरित फातोर्डा पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली. या घटनेची   गुरुवारी मडगावात जोरदार चर्चा सुरू होती.

पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी सांगितले,की तिघे पोलिस शिपाई दारूच्या नशेत होते आणि त्यांनी पोलिस अधीक्षकांना ओळखले नाही.  त्यांची वैद्यकीय चाचणी  करण्यात आली  असून  त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठविण्यात आला आहे.  प्राप्त माहिती प्रमाणे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. फातोर्डा पोलिस पुढील तपास करीत आहेत.