पणजी : प्रतिनिधी
वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या जुने गोवे येथील कथित अनधिकृत बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर कारवाई करण्याचे निर्देश नगरनियोजन खात्याने जुने गोवे पंचायतीला दिले आहेत. तिसवाडीचे उपनगरनियोजक आर. एन. वळवईकर यांनी यासंदर्भात जुने गोवे पंचायतीचे सरपंच तसेच पंचायत सचिवांना निर्देश दिले आहेत.
मडकईकर यांच्या कथित अनधिकृत बंगल्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्ते अॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची चौकशी करून ही कारवाई करावी, असे या निर्देशात नमूद करण्यात आले आहे. मडकईकर यांच्या बंगल्याची संरक्षक भिंत ही बॅसिलिका ऑफ बॉम जिजस या चर्चच्या 300 मीटर्स इतक्या प्रतिबंधात्मक अंतरात उभारली आहे.
सदर बंगला मडकईकर यांच्याच निकिताशा रियाल्टर्स प्रा. लि. तर्फे उभारण्यात आला आहे. जुने गोवे पंचायतीच्या सरपंच जनिता मडकईकर या वीज मंत्री पांडुरंंग मडकईकर यांच्या पत्नी असून त्या निकिताशा रियाल्टर्स प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत. नगरनियोजन खात्याने मडकईकर यांच्या बंगल्यावर कारवाई करण्याबाबत संग्रहालय व पुरातत्त्व संचालकांना निर्देश दिले आहेत.