Sun, Jul 21, 2019 08:07होमपेज › Goa › अतिरिक्‍त वीज वापरणार्‍यांवर यापुढे कारवाई

अतिरिक्‍त वीज वापरणार्‍यांवर यापुढे कारवाई

Published On: Sep 13 2018 1:43AM | Last Updated: Sep 13 2018 12:39AMपणजी : प्रतिनिधी

परवानगीपेक्षा अतिरिक्‍त वीज वापरणार्‍या  ग्राहकांनी अतिरिक्‍त विजेसाठी 30 दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून  करण्यात आली आहे.  अतिरिक्‍त  विजेसाठी मागणी अर्ज न केल्यास बेकायदेशीरपणे विजेचा वापर होत असल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करू, असा  इशारा मुख्य अभियंते एन. एन. रेड्डी यांनी दिला आहे.

राज्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून त्यामागे नेमके काय कारण असावे, याचा खात्याकडून  शोध घेण्यात आला. त्यावेळी कमी क्षमतेची वीज जोडणी असलेले ग्राहकही अनेकदा अतिरिक्त वीज वापरत असल्याचे आढळून आले. राज्यात होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याचे हे एक कारण असल्याचे वीज खात्याचे मुख्य अभियंते एन एन रेड्डी यांनी म्हटले आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीज खात्याने आवश्यकतेनुसार आणि मागणीप्रमाणेच वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना अतिरिक्त विजेची गरज लागते त्यांनी बुधवारपासून 30 दिवसांच्या आत अतिरिक्त विजेसाठी  मागणी करणारे अर्ज वीज खात्यात सादर करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.तशी जाहिरातही खात्याकडून जारी करण्यात आली आहे. 

अतिरिक्त वीज वापरण्याचे प्रकार राज्यात सर्रास घडत नसले तरी किनारी भागात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे खात्याला आढळून आले आहे.  विजेचे संमत प्रमाण  व  प्रत्यक्ष वापरण्यात आलेली वीज यात फार मोठी तफावत आढळून आली आहे. त्यामुळे वीज खात्याने हे पाऊल उचलले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

एखाद्या भागात  विजेची नेमकी किती आवश्यकता आहे, याचा अंदाज खात्याला यामुळे येणार आहे. त्यामुळे त्या भागात गरज आहे तेव्हढ्याच क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर  बसवून वीज पुरवठा करणे खात्याला शक्य होणार आहे.  30 दिवसांच्या आत ज्या ग्राहकांनी अतिरिक्त वीज जोडणीसाठी अर्ज केला नसेल आणि त्यांच्या वीज बिलात अतिरिक्त वीज खर्च केलेली आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशाराही देण्यात आला आहे.