Sun, Apr 21, 2019 14:25होमपेज › Goa › झुआरी पुलाचे काम 2019 अखेर पूर्ण

झुआरी पुलाचे काम 2019 अखेर पूर्ण

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 11:44PMपणजी : प्रतिनिधी 

झुवारी नदीवरील  नव्या आठ पदरी   केबलस्टेड  पुलाचे काम  2019 अखेरपर्यंत पूर्ण होईल. आतापर्यंत या पुलाचे जवळपास  30 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. झुुवारीवरील नव्या पुलाच्या कामाची  बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री ढवळीकर यांनी   अन्य अधिकार्‍यांसोबत पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते.केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने हा पूल उभारण्यात येत आहे. पुलाच्या बांधकामाची पायाभरणी  1 जानेवारी 2016 रोजी झाली होती.   या पुलासाठी संलग्न रस्त्यांचे कामही सुरू असल्याचेही  ढवळीकर यांनी सांगितले.

मंत्री  ढवळीकर म्हणाले,  नव्या झुवारी पुलाची  लांबी  640 मीटर्स इतकी   आहे.  नवा पूल   जागतिक दर्जाचा असेल. त्यावर दोन प्रेक्षणीय टॉवर्सही उभारण्यात येणार असून  प्रत्येक टॉवरची उंची  125 मीटर्स इतकी असेल. या टॉवरवरून  लोकांना   आजूबाजूचा परिसरही न्याहाळता येणार आहे. झुवारी  प्रकल्पावर  एकूण  3 हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.   या पुलाच्या संलग्न   रस्त्यांसाठी 1 हजार 403 कोटी रुपयांची निविदा   जारी केली आहे. पुलाचे  काम   भोपाळस्थित दिलीप बिल्डकॉन लिमिटेडने   हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारकडून  हाती घेण्यात आलेल्या  खांडेपार पूल तसेच ढवळी बगलमार्गाचे काम  जुलै महिन्यांपर्यंत पूर्ण होईल, असा विश्‍वास  ढवळीकर यांनी व्यक्त केला.  ते म्हणाले, पत्रादेवी ते  बांबोळी या  राष्ट्रीय महामार्ग 17 साठी भू संपादन प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होताच त्याचे काम हाती घेतले जाईल. याशिवाय  बाणस्तारी  तसेच  बोरी हे दोन नवे पूल उभारण्यात येणार आहेत. शिरदोण ते गोवा वेल्हा असा 2.5 किलो मीटरर्सचा उड्डाणपूलही उभारला जाणार  असल्याचे  मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.