Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Goa › संस्कृती संवर्धनात युवकांनी पुढाकार घ्यावा

संस्कृती संवर्धनात युवकांनी पुढाकार घ्यावा

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:19PMपेडणे : प्रतिनिधी

संगीत क्षेत्रात पेडणे तालुका  पुढे असून तालुक्याने राज्याला अनेक कलाकार दिले आहेत. कलाकारांच्या  स्मृतींना उजाळा देण्यासाठी एखादी संस्था त्यांच्या स्मरणार्थ एखादे संमेलन आयोजित करते, ही कौतुकास्पद बाब आहे. संगीत संमेलन आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केले.कला आणि संस्कृती खाते आणि राजाराम कला दर्पण यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्व. राजाराम परब यांच्या स्मरणार्थ वारखंड येथे आयोजित  संगीत संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आजगावकर बोलत होते. यावेळी संगीततज्ज्ञ भाई ऊर्फ दामोदर शेवडे, सरपंच प्रदीप कांबळी, राजाराम कलादर्पण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग परब, माऊली शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष बाबलो परब, मधुकर परब, हनुमंत परब, बाबाजी परब आदी मान्यवर उपस्थित  होते .

मंत्री आजगावकर पुढे म्हणाले की, नव्या पिढीला संगीताचे बाळकडू पाजताना संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. गोमंतकीय कलाकारांनी आपली कला देशपातळीवर पोहोचवली पाहिजे. तसेच गोमंतकीय कलाकारांच्या कार्यक्रमांना लोकांना मोठ्या संख्येने उपस्थिती लावून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. स्व. राजाराम परब संगीत संमेलनातील लोकांच्या अत्यल्प उपस्थितीबाबत मंत्री आजगावकर यांनी नाराजी व्यक्‍त केली.

दामोदर शेवडे म्हणाले की, गोमंतकीय कलाकार हे रसिकांना मायबाप मानत होते, त्यांच्या रुपात ते देव पाहात होते. संगीताचा  रियाज  करणारे खूप आहेत. परंतु, त्यांना वेळोवेळी व्यासपीठ उपलब्ध झाले तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. कोणताही कार्यक्रम किंवा संगीत महोत्सवाचे आयोजन करताना आर्थिक व इतर अडचणी येतात, असेही त्यांनी सांगितले. स्व. जयराम परब, स्व. गोविंद धारगळकर, स्व. नारायण डावरे यांचा मरणोत्तर तर शांबा परब,  लक्ष्मण  परब व जनार्दन देसाई यांचा पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ऋषिकेश फडके यांचे एकल तबला वादन,  सिद्धेश पवार यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन, पंडित पेडणेकर यांचे शास्त्रीय गायन झाले. गायक कलाकारांना सुभाष फातर्पेकर, रोहिदास परब यांनी साथसंगत केली. नियती पार्सेकर, संस्कृती परब यांनी  पाहुण्याचे स्वागत केले. गोविंद भगत यांनी  सूत्रसंचालन केले.  रामदास डावरे यांनी  आभार मानले.

कलाकारांना रसिकांचा पाठिंबा हवा

कलेसाठी त्याग करणार्‍या कलाकारांना रसिकांनी  पाठिंबा दिला पाहिजे. पेडणे शिमगोत्सव समिती आणि इतर संस्थांनी एकत्रित येऊन पेडणे तालुक्यात एखादे संगीत संमेलन आयोजित करावे. कलेचे माहेरघर असलेल्या पेडणे तालुक्यात येत्या तीन वर्षात रवींद्र भवन उभारण्यात येईल, याचा पुनरुचार करून यापुढेही दर्जेदार संगीत मैफलींचे आयोजन करावे, असे आवाहन मंत्री मनोहर आजगावकर यांनी यावेळी केले.

Tags : Goa, Youth, take, initiative,  culture, conservation