Sun, Aug 18, 2019 15:27होमपेज › Goa › युवकांनी शेती व्यवसायात लक्ष घालावे : राजेश पाटणेकर

युवकांनी शेती व्यवसायात लक्ष घालावे : राजेश पाटणेकर

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 03 2018 12:20AMपाळी : वार्ताहर

राज्याने कृषी क्षेत्रात आघाडी घेतली आहे. सरकारने कृषी खात्यातर्फे अनेक योजना राबवून शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले आहे. युवकांनीही शेती व्यवसायात लक्ष घालावे, असे आवाहन डिचोलीचे आमदार तथा गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष राजेश पाटणेकर यांनी केले.

साखळी रवींद्र भवन येथे कृषी संचलनालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन समिती उत्तर गोवा, विभागीय कृषी कार्यालय-साखळी व साखळी  रवींद्र भवन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवशीय कृषी महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी प्रमूख पाहुणे म्हणून आमदार पाटणेकर बोलत होते. व्यासपीठावर  माजी उपसभापती नरहरी हळदणकर, कृषी संचालक नेल्सन फिग्रेदो, साखळी कृषी अधिकारी किशोर भावे, साखळीचे नगरसेवक आनंद काणेकर, राजेश सावळ, कुडणेचे  सरपंच राजन फाळकर, प्रदीप गावडे  उपस्थित होते. 

आमदार पाटणेकर  म्हणाले, की  राज्य सरकारतर्फे शेतकर्‍यांना शेतीची अत्याधुनिक यंत्रसामुग्री पुरवली जात आहे.   शेतकर्‍यांनी कर्ज घेताना सावकारी कर्जाचा बोजा न घेता राष्ट्रीयकृत बँका किंवा सहकारी बँकांचा आधार घ्यावा. योग्य मार्गदर्शन घेऊनच शेती व्यवसाय करावा. गोव्यात जमीन व पाणी   उपलब्ध असताना गोवेकरांनी भाजी साठी इतर राज्यांवर विसंबून राहू नये. 

नरहरी हळदणकर म्हणाले, की  बदलत्या परिस्थितीनुसार आजची शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केली तरच परवडणारी आहे. सरकारतर्फे  देण्यात येणार्‍या सवलतींचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा. नेल्सन फिगरेदो म्हणाले, की  शेतीद्वारे पैसेही कमविता येतात. शेती हा उत्कृष्ट व्यवसाय आहे, हे पटवून देण्यासाठीच हा कृषी महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवात शेतीविषयक सर्व माहिती व फायदे पटवूून देण्यात येतील. शेती व्यवसायात शेती बागायती व्यतिरिक्त पशूपालन आदींचाही समावेश आहे.  यापैकी कुठलाही व्यवसाय स्वीकारुन काम करता येते.

शेतकरी लक्ष्मीकांत धोंड, विनोद भावे व नास्वीन मेगस यांचा उत्कृष्ट शेती व्यवसायाबद्दल  मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यातआला.नरहरी हळदणकर यांच्याहस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. नगरगाव  विद्यालयाच्या विद्यार्थिनिंनी स्वागत गीत सादर केले. किशोर भावे यांनी  स्वागत केले.  गोविंद परब यांनी सूत्रसंचालन केले.  पुनम महाले यांनी आभार मानले.