Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Goa › धर्मापुरात तरुणाचा सुरा भोसकून खून

धर्मापुरात तरुणाचा सुरा भोसकून खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव :  प्रतिनिधी

रात्रीच्यावेळी  दंगा करून झोपमोड केल्याच्या   वादातून मित्रांशी मोठ्या आवाजात गप्पा मारणार्‍या  लिस्टन कुलासो (26, मांडोप) या तरुणाचा  फ्रान्सिस फेर्नांडिस (46, मिंगेल वाडा, धर्मापूर) याने  सुरा भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री धर्मापूर येथे घडली. याप्रकरणी संशयिताला अटक केली असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मडगावचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 8.30 च्या सुमारास मृत लिस्टन हा नावेलीचा रहिवासी मेलकोंम मस्कारेन्हास, जेस्पर परेरा आणि लेवीन्टन कुलासो या    तिघा मित्रांबरोबर कच्चा रस्ता, धर्मापूर येथील कालव्याजवळ मोठमोठ्याने गप्पा मारत बसले होते. यावेळी संशयित फ्रान्सिस हा रागाच्या भरात तिथे आला आणि दंगा का करताय, अशी विचारणा करून   त्यांच्याशी वाद घातला. यावेळी झालेल्या भांडणात फ्रान्सिसने   लिस्टनच्या पोटात सुरा खुपसला. घाव वर्मी लागल्याने लिस्टन गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित तिघा मित्रांनी इस्पितळात दाखल केले. मात्र, तेथील   डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

फ्रान्सिस हा घटनास्थळापासून 500 मीटर्स अंतरावर राहत होता. रात्री लिस्टन व त्याच्या मित्रांच्या मोठमोठ्या आवाजात गप्पांबद्दल फ्रान्सिसने त्यांच्याजवळ येऊन जाब विचारल्याने  वादाला तोंड फुटले आणि सदर खुनाचा प्रकार घडला. लिस्टन हा दुबईत नोकरी करीत होता आणि एका महिन्यापूर्वीच गोव्यात आला होता. संशयित फ्रान्सिस विवाहित असून बेरोजगार आहे.

लिस्टनचा मित्र मेलकोमने मंगळवारी उशिरा पोलिस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फ्रान्सिसला त्याच्या घरातून  अटक केली. पुढील तपास सुरू असल्याचे  पोलिस निरीक्षक  नायक यांनी सांगितले. 

Tags : Dharmapur,  Young murder, crime news, goa, 


  •