Thu, Jun 27, 2019 10:10होमपेज › Goa › फर्मागुडी येथे अपघातात तरुण ठार

फर्मागुडी येथे अपघातात तरुण ठार

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 1:54AMफोंडा : प्रतिनिधी

फर्मागुडी येथील जीइसीकडे जाणार्‍या रस्त्यावर रविवारी रात्री  9 वाजण्याच्या सुमारास अल्टो कार व यामाहा दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात वासिम अब्दुल शेख (वय 28, काजीवाडा, फोंडा) याचा मृत्यू झाला, तर मुश्रफ सलीम झालेगर (22, दत्तगड बेतोडा) हा दुचाकीच्या मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून कार चालक मुश्रफ शाह (28, वाळपई) याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने कारची तोडफोड केली. मृत वासिम शेख यांनी गोव्यात व राज्याबाहेर  कार रेसमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे पटकाविली होती. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे फोंडा परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए 04 सी 9741 क्रमांकाची अल्टो कर फर्मागुडीहून जीइसीच्या दिशेने जात होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फर्मागुडी 
रेसिडेंसीमध्ये कार्यक्रमात आलेल्या कारचालकाने कार पार्क करण्यासाठी उजवीकडे वळविली असता मागून येणार्‍या जीए 02 सी 4057 क्रमांकाच्या यामाहा दुचाकीची कारला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेहीजण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या लोखंडी कठड्याला जोरात आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. यावेळी जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र, इस्पितळातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वासिम शेख याला मृत घोषित केले.  गंभीर जखमी झालेल्या मुश्रफ झालेगर याला अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच आमदार रवी नाईक यांनी उपजिल्हा इस्पितळात जाऊन चौकशी केली. 

दरम्यान, अपघातानंतर संतप्त जमावाने अपघातग्रस्त कारची तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण ठेवले. सोमवारी सकाळी पोलिसांनी कारचालक मुश्रफ शाह याला अटक केली. सोमवारी सकाळी गोमेकॉत उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. निरीक्षक हरीश मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी व हवालदार संदीप खाजनकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. 

Tags :Young killed ,accident ,Pharmagudi,goa news