होमपेज › Goa › योग प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग व्हावा 

योग प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग व्हावा 

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 11:31PMपणजी : प्रतिनिधी

भारतीयांच्या जीवनशैलीचा भाग असलेल्या योगाने आता विश्‍वरूप धारण केले आहे. योग साधनेमुळे सर्व विश्‍व एका कुटुंबाप्रमाणे एकत्र आले आहे.  योग दिन आता  जगभरात  साजरा केला जात आहे. आपली प्राचीन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तसेच   शरीरस्वास्थासाठी योग प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केले. चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आरोग्य सेवा संचालनालयाने क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारतर्फे बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गुरूवारी सकाळी 7  वाजता  आयोजित कार्यक्रमात सिन्हा बोलत होत्या. 

राज्यपाल सिन्हा म्हणाल्या की, जीवनात  येणारी संकटे आणि समस्यांमुळे आपल्याला निराशा येते, त्यावेळी चित्तवृत्ती पुन्हा जागी  ठेवण्याचे काम योग करतोे. योग आज शालेय विद्यार्थ्यांपासून सरकारी अधिकारी ते घरातील गृहिणींपर्यंत पोचला आहे. श्‍वासोछ्वासावर नियंत्रण आणणे शिकल्यास तणावमुक्त जीवन प्राप्त होते. यासाठी योग नियमित केल्याने  होणारे लाभ दर्शवणारी चित्रे शालेय विद्यार्थ्यांना फलकावर दिसली पाहिजेत. योग जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचा संकल्प   आज आपण करावा. 

मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा म्हणाले की, योगामुळे आत्मा, तन आणि मन यांचा सुंदर आणि संतुलित विकास होतो. योग हा भारताचा ‘राजदूत’ बनला असून  योगाला आता जगभरात मान्यता मिळाली आहे.  
व्यासपीठावर आरोग्य खात्याचे सचिव जे. अशोक कुमार, गोवा क्रीडा  प्राधिकरणाचे संचालक एम. व्ही. प्रभूदेसाई, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव एस. व्ही. सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.योगगुरू डॉ. सुरज काणेकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारी अधिकारी, शिक्षक आणि स्थानिक शाळांतील विद्यार्थी, अशा सुमारे एक हजार जणांनी योगाभ्यास केला. आरोग्य सचिव जे. अशोक कुमार यांनी स्वागत केले. मिलिंद महाले यांनी सूत्रसंचालन केले तर महेश वेर्णेकर यांनी आभार मानले.