Fri, Apr 19, 2019 12:17होमपेज › Goa › विदेशी लोकांनाही योगाचे आकर्षण

विदेशी लोकांनाही योगाचे आकर्षण

Published On: Feb 03 2018 2:25AM | Last Updated: Feb 02 2018 11:58PMफोंडा ः प्रतिनिधी

योगामुळे शारीरिक व मानसिक ताण कमी होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाची जगभर प्रसिद्धी केल्याने विदेशी लोकसुद्धा योगाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे भारताने जगभरात योगाचा केलेला प्रसार यशस्वी ठरत आहे, असे प्रतिपादन नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी केले. कुंडई येथे अमेरिका येथील विश्र्योग समुदाय, सद्गुरू फाऊंडेशन व सद्गुरू योग गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने तपोभूमी येथे आयोजित  आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.  

सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी, मंत्री पांडुरंग मडकईकर, मंत्री जयेश साळगावकर, आमदार प्रसाद गावकर, गुरुमाता ब्राह्मीदेवी, जगद्गुरु दिलीपकुमार थंकपन, महामंडलेश्‍वर शिवानंद सरस्वतीजी, गुरु आनंद वितरग. योगी आशुतोष, डॉ. गोपालजी, महंमद इम्रान अली, व अन्य मान्यवर व्यासपीठावर  होते. 

आंतरराष्ट्रीय योग महोत्सव तपोभूमी येथे आयोजन करून सरकारचे योगप्रसाराचे काम   ब्रह्मेशानंद स्वामींच्या आशीर्वादाने सुलभ झाले. प्रत्येकाने प्रतिदिन किमान 10-15 मिनिटे योग करून तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, योगासन करताना जागरुक राहून सरकारच्या चुका दाखविण्याचे काम गोमंतकियानी केले पाहिजे, असेही सरदेसाई म्हणाले. 

ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव गोव्यात दरवर्षी होतो त्याप्रमाणे योग महोत्सव होणे गरजेचे आहे. योग या शब्दाला मोठे महत्त्व असून सर्व मतभेद विसरून संघटित होण्याची आवश्यकता असल्याचे सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी यांनी सांगितले. युवा वर्गाने राजकारणात प्रवेश करण्याची इच्छाशक्ती ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सत्तेचे योग येऊन युवकांकडून चांगले कार्य घडणार असल्याचेही सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी यांनी सांगितले.  

मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी धावपळीच्या जीवनात व्यायाम होत नसल्याने आरोग्याची दमछाक होते. त्यासाठी योगा आत्मसात  करून सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे सांगितले.  मंत्री जयेश साळगावकर यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करून योगाचे महत्त्व पटवून दिले.