Sun, Jul 21, 2019 08:19होमपेज › Goa › टुरिस्ट टॅक्सींना स्पीड गव्हर्नरसाठी वर्षाची मुदत 

टुरिस्ट टॅक्सींना स्पीड गव्हर्नरसाठी वर्षाची मुदत 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 1:22AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील टुरिस्ट टॅक्सींना स्पीड गव्हर्नर बसवण्यासाठी अजून एक वर्ष मुदत देण्याचे सरकारने तत्त्वत: मान्य केले. सवलत देण्याविषयीच्या फाईलवर वाहतूक खात्याने प्रक्रिया सुरू केली आहे, असे सरकारी सूत्रांनी मंगळवारी सांगितले.

याआधी राज्यातील बसगाड्यांना स्पीड गव्हर्नर बसवण्यात आले आहेत. पर्यटक टॅक्सी वगळता अन्य प्रकारच्या टॅक्सींनाही स्पीड गव्हर्नर बसवले गेले आहेत. फक्‍त पर्यटक टॅक्सींना स्पीड गव्हर्नर न बसवल्याने त्यांना ‘फिटनेस प्रमाणपत्र’ दिले जात नव्हते. नुकत्याच झालेल्या टॅक्सीवाल्यांच्या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पीड गव्हर्नर बसवण्यासाठी आणखी काही मुदत देण्याचे तत्त्वत: मान्य केले आहे. टॅक्सीवाल्यांनी राज्यात स्पीड गव्हर्नर पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे कारण दाखवल्याने ते बसवण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदत देण्याचे वाहतूक खात्याने ठरविले आहे. 

वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता टॅक्सी व्यावसायिकांना स्पीड गव्हर्नर  बसवण्यासाठी फेब्रुवारी-2019 पर्यंत मुदत मिळणार आहे. या बारा महिन्यांच्या कालावधीत स्पीड गव्हर्नर लावण्याचे काम टॅक्सी मालकांना पूर्ण करावे लागेल, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. राज्यात पुरेशा प्रमाणात स्पीड गव्हर्नर आणि वितरक उपलब्ध व्हावेत म्हणून सरकारने सवलत देण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकारच्या रस्ता वाहतूक मंत्रलयाने गेल्या डिसेंबर महिन्यात सर्व राज्य सरकारांना पत्र लिहून स्पीड गव्हर्नर्स उपलब्ध नसतील तर थोड्या काळाची सवलत दिली जावी, अशी सूचना केली होती. त्यानुसार सवलत दिली जात आहे. वाहतूक खात्याने याबाबतची फाईल पुढील प्रक्रियेसाठी वाहतूक सचिवांकडे पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  सचिवांकडून ही फाईल वाहतूक मंत्र्यांकडे व तिथून मग मुख्यमंत्र्यांकडे पाठविली जाणार आहे.