होमपेज › Goa › २०२२ पर्यंत जगाचे नेतृत्व भारताकडे 

२०२२ पर्यंत जगाचे नेतृत्व भारताकडे 

Published On: Aug 13 2017 2:01AM | Last Updated: Aug 13 2017 1:49AM

बुकमार्क करा

दाबोळी : प्रतिनिधी

येणार्‍या पाच वर्षांच्या कालावधीत 2022 सालापर्यंत आपला भारत देश हा जगाचे नेतृत्व करणारा देश होईल. जागतिक महाशक्तीसह प्रमुख राजनैतिक शक्तीदेखील होईल, असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दाबोळी येथे केले. 

गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने भारतीय तटरक्षक दलासाठी बांधलेल्या ‘आयसीजीएस शौर्य’ या अपतटीय गस्तीनौकेचे शनिवारी लोकार्पण करण्यासाठी गोवा शिपयार्डच्या आवारात एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान बोलत होते.

ना. प्रधान म्हणाले, आपल्या देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असून यात समुद्री अर्थव्यवस्थेतून भर पडत असून भारत आर्थिकदृष्ट्या महाशक्तीू होईल. तटरक्षक दल किनारपट्टीच्या संरक्षणासाठी नेहमीच दक्ष आहे. ‘शौर्य’ गस्तीनौकेमुळे तटरक्षक दलाच्या शौर्यात अधिक वाढ होऊन तटरक्षक दलाची ताकद वाढेल.

गोवा शिपयार्डचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर अ‍ॅडमिरल शेखर मित्तल यांनी पाचव्या तटरक्षक गस्तीनौकेची बांधणी वेळेपूर्वीच पूर्ण केल्याचे सांगितले. हा जीएसएल व तटरक्षक दलासाठी मैलाचा दगड ठरणारी घटना आहे.