होमपेज › Goa › ‘साळावली’च्या कठड्यावरून महिलेची उडी

‘साळावली’च्या कठड्यावरून महिलेची उडी

Published On: Aug 28 2018 1:25AM | Last Updated: Aug 28 2018 12:05AMमडगाव : प्रतिनिधी 

साळावली जलाशयातून खाली पडणार्‍या पाण्याचे विहंगम दृश्य पाहण्यात सर्व पर्यटक दंग असताना रविवारी (दि.26) संध्याकाळी एका 35वर्षीय महिलेने अचानक आपल्या लहान मुलीला सोडून धरणाच्या कठड्यावरून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी मारल्याने एकच खळबळ माजली. सुमारे 50 मीटर खाली पडूनसुद्धा वाढलेल्या गवतामुळे तिला काहीच इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला. 

साळावली धरणाचे खुललेले सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी मोठ्या प्रमाणात लोक जलाशय परिसरात आले होते. महिला सुरक्षारक्षक सायंकाळचे सहा वाजून गेल्याने ड्युटी आटोपून निघून गेल्या होत्या.

रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक धरणावर आले होते. सायंकाळी 5.30 वाजल्यानंतर पर्यटकांना सुरक्षेच्या कारणामुळे धरणक्षेत्रात प्रवेश दिला जात नाही. सायंकाळी उशिरा धरणावर उतरलेले पर्यटक माघारी येत होते.या पर्यटकांच्या गर्दीत कुडचडे भागातील शेल्डे येथील एक विवाहित महिला आपल्या लहान मुलीसोबत धरणावर आली होती. यावेळी त्यांच्या बरोबर अन्य एक इसम होता. सदर महिला सुरवातीपासून धरणावर गोंधळ घालत होती. सुरुवातीला तिने धरणावरून खाली कोसळणार्‍या पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला.पण त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि इतर पर्यटकांनी तिला बाजूला काढले. ती कोणाचे म्हणणे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.पुन्हा तिने आपल्या लहान मुलीला बाजूला ठेऊन दुसर्‍या कठड्या वरून पाण्यात  उडी मारण्याचा प्रयत्न केला.

पर्यटकांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने लोकांना अपशब्द वापरणे सुरु केले.बोरी च्या पुलावरुन अनेक लोकांनी उडी घेतली आहे, त्यांना का वाचवले नाही, असे म्हणत ती पुन्हा पुन्हा खाली उडी टाकण्याचा प्रयत्न करत होती. महिला सुरक्षा रक्षक ड्युटी आटोपून निघून गेले होते.त्यामुळे पुरुष सुरक्षा रक्षक तिला पकडण्यास मागे पुढे करू लागल्याने अखेर पर्यटकांनी सांगे पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.तिला आत्महत्या करण्यापासून रोखणार्‍या लोकांना ती शिव्या देऊ लागली होती, याचे चित्रीकरण करून काहींनी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसृत केला.

हा गोंधळ पाहण्यासाठी अनेक लोक धरणावर जमले होते. तू आत्महत्या केल्यास पर्यटकांसाठी साळावली धरणावर प्रवेश बंद केला जाईल, असे लोक तिला सांगत होते. शेवटी ती महिला बरोबर असलेल्या मुलीला घेऊन साळावली धरणाच्या बोटॅनिकल गार्डनच्या दिशेने असलेल्या कठड्यावर जाऊन बसली.लोकांना आता काही होणार नाही, असे वाटत असतानाच अचानक तिने स्वतःला खाली झोकून दिले.खाली उडी मारलेली ती महिला सुमारे 50 मीटर खाली गडगडत आली.धरणाच्या दुसर्‍या बाजूला सुरक्षेसाठी पाषाणी दगड लावण्यात आले आहेत. त्यावर बरेच गवत वाढलेले असल्याने तिला जास्त दुखापत झाली नाही.बेशुद्धावस्थेत ती अर्ध्यावर राहिली.शेवटी सांगे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.पण त्यांच्या बरोबर महिला पोलिस कॉन्स्टेबल आल्या नव्हत्या.शेवटी त्या महिलेला इतर लोकांच्या मदतीने उचलून पोलिस जीपमधून सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

सांगे पोलिसांशी संपर्क साधला असता सदर महिलेला उपचारानंतर इस्पितळातून घरी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.ती कठड्या वरून खाली कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्या महिलेने पर्यटकांशी घातलेला वाद आणि तिने धरणावरून खाली उडी मारल्याच्या घटनेचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.दरम्यान, असे प्रकार रोखण्यासाठी साळावली धरणावर सुरक्षा वाढवण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे.