Mon, Apr 22, 2019 16:25होमपेज › Goa › लोकसभेसाठी महिलांनी सज्ज व्हावे : मनोहर पर्रीकर 

लोकसभेसाठी महिलांनी सज्ज व्हावे : मनोहर पर्रीकर 

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 10 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

देशभरातील महिला भारतीय जनता पक्षासाठी बर्‍यापैकी कार्य करीत आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महिलांनी सज्ज राहिले पाहिजे व अधिकाधिक लोकांपर्यंत पोचले पाहिजे. लोकांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर द्यावे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.  

भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रदेश  महिला मोर्चातर्फे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित राज्य  कार्यकारिणी बैठकीत मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. व्यासपीठावर राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर,  भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया राहटकर, उपाध्यक्षा कौशल्या परवार, गोवा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा सुलक्षणा सावंत, उपाध्यक्षा कुंदा चोडणकर, अंकीता नावेलकर, पूनम सावंत व स्वप्ना मापारी उपस्थित होत्या. राज्यभरातील भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.  

तेंडुलकर म्हणाले, की देशात 2019  मध्ये देखील भाजपचे सरकार यावे यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. महिलांनी एकजुट होऊन ताकदीने पुढे येणे आवश्यक आहे. गोवा भाजपसाठी लाभदायक आहे. येणार्‍या लोकसभा निडणुकीत पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येणार आहे. सर्वांनी एकत्रितपणे या दिशेने कार्य केले पाहिजे.

विजया राहटकर म्हणाल्या, की सत्ता प्राप्त करणे इतकेच भाजपचे उद्दिष्ट नसून लोक सहभाग वाढवणे  हे पक्षाचे ध्येय आहे. देशातील तीन कोटीहून अधिक महिला भाजपला सहकार्य करतात. पक्षाने विशेषत: महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना लागू केल्या आहेत. विविध योजनांद्वारे भाजपने महिलांना सशक्‍त बनविले आहे. विरोधक असताना तेव्हा आंदोलन, मोर्चे करणे सोपे असते. मात्र, सत्तेत आल्यानंतर विकासावर लक्ष द्यावे लागते. भाजप केवळ विकासाच्या दिशेने पावले उचलत आहेत.