Wed, Jul 17, 2019 16:40होमपेज › Goa › लाडली लक्ष्मींचे अर्थसहाय्य लग्नावेळीच द्यावे 

लाडली लक्ष्मींचे अर्थसहाय्य लग्नावेळीच द्यावे 

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 23 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी  

लाडली लक्ष्मी योजनेतून मिळणार्‍या पैशांमुळे लाभार्थी मुलींचा सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर या योजनेत दुरुस्ती करावी. महिलांना लोकसभेत तसेच विधानसभेत 33 टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन प्रदेश महिला काँग्रेसतर्फे  मंगळवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना सादर करण्यात आल्याची माहिती प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी दिली.

कुतिन्हो म्हणाल्या, राज्य सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत मुलींना लग्नासाठी  एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, या योजनेंतर्गत  लग्नानंतर लाभार्थींना ही रक्कम दिली जाते. त्यामुळे या पैशांसाठी  मुलींचा सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या योजनेत दुरुस्ती करून सदर रक्कम ही लग्नावेळी दिली जावी, अशी मागणीही त्यांनी केली.

 लोकसभा तसेच राज्य विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे,  ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र, त्याची दखल अजूनही घेण्यात आलेली नाही. ही मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडेही मांडण्यात आली होती. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठवण्यात आलेहोते. मात्र अजूनही या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही, असेही कुतिन्हो म्हणाल्या.

सरकारी महामंडळे, मंडळे, समित्यांवरही महिलांना आरक्षण द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्था जसे पालिका व पालिकांमध्ये असलेले 33 टक्के आरक्षण वाढवून ते 50 टक्के करावे, असेही त्या म्हणाल्या.
दक्षिण गोवा काँग्रेस महिला अध्यक्ष  सावित्री कवळेकर म्हणाल्या,  राज्यात असलेल्या सर्व पोलिस स्थानकांमध्ये महिलांच्या तक्रारी हाताळण्यासाठी स्वतंत्र महिला कक्षाची स्थापना  करावी. सदर कक्ष हा महिला पोलिस उपनिरीक्षकांच्या  मार्गदर्शनाखाली कार्यरत करावा, अशी मागणी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष बीना नाईक, प्रतिमा बोरकर व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.