Fri, Jul 19, 2019 18:09होमपेज › Goa › ‘स्वच्छ भारत’साठी महिला स्वयंसहाय्य गटांनी पुढे यावे

‘स्वच्छ भारत’साठी महिला स्वयंसहाय्य गटांनी पुढे यावे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फोंडा : प्रतिनिधी

गोव्यातील महिला इतर राज्यांहून सुरक्षित असून सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. गोव्यात स्वच्छ भारत अभियान अजून  यशस्वी झालेले नाही. गोवा कचरा मुक्‍त करण्यासाठी  प्रत्येक गावातील स्वयंसहाय्य गटांमार्फत महिलांनी पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा  यांनी केले. 

बांदोडा येथील काशीमठ मैदानावर माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे आयोजित महिला मेळाव्यात राज्यपाल मृदुला सिन्हा बोलत होत्या. यावेळी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, सिनेतारका श्रुती मराठे, डॉ. नूतन देव, ज्योती ढवळीकर, संगीता अभ्यंकर, चित्रा फडते व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. सिन्हा म्हणाल्या, महिलांना मुळातच स्वच्छतेची आवड असते. आपल्या घरात जशी स्वच्छता त्यांना हवी असते, अगदी तशीच स्वच्छता समाजात, आपल्या आजूबाजूच्या परिसरातही असावी, अशी अपेक्षा असते. म्हणून महिलांनी स्वच्छ भारत योजनेच्या यशासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

महिलांच्या जीवनात दोन घरांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याची वेळ येते. मात्र, प्रत्येक महिला आपली जबाबदारी ओळखून स्वतःच्या मुलांबरोबर इतर मुलांवरही योग्य संस्कार करीत असतात, असेही त्या म्हणाल्या. बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, पाणी हे अमृत असून सरकारतर्फे पुरवठा होणार्‍या पाण्याचा योग्य वापर करावा. गोव्यातील स्त्री शक्ती अधिक बळकट होणे गरजेचे आहे. स्त्रीच्या योगदानामुळेच कुटुंबाची प्रगती होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अभिनेत्री श्रुती मराठे हिने सांगितले की, स्त्रीच्या आयुष्यात अनेक अडचणी नेहमीच येतात. कठीण  प्रसंगांवर मात करण्याचा आत्मविश्वास मात्र तिच्यात असला पाहिजे. मात्र, तिने कोणत्याही स्थितीत आत्मविश्वासाला तडा जाऊ  देऊ नये. ज्योती ढवळीकर, डॉ. नूतन देव यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते डॉ. नूतन देव, संगीता अभ्यंकर, डॉ. अनिता तिळवे व श्रुती मराठे यांचा गौरव करण्यात आला. 

 

Tags : goa, goa news, Clean India, Women,  Mridula Sinha,


  •