Tue, Mar 26, 2019 20:27होमपेज › Goa › गव्याच्या हल्ल्यात महिला ठार

गव्याच्या हल्ल्यात महिला ठार

Published On: Jun 07 2018 4:22PM | Last Updated: Jun 07 2018 12:56AMवाळपई : प्रतिनिधी 

सत्तरी तालुक्यातील गुळेली पंचायत क्षेत्रातील कणकिरे येथे बुधवारी सकाळी काजू बागायतीत रोप  लागवडीसाठी गेलेल्या जयंती आनंद गावकर (44)  या महिलेवर  एका जखमी गव्याने हल्ला करून तिला ठार केले.  दरम्यान, या गव्याचा  तातडीने बंदोबस्त  न केल्यास त्याचे गंभीर परिणाम येणार्‍या काळात वनखात्याला भोगावे लागतील, असा इशारा भागातील  रहिवाशांनी दिला.

श्रीमती जयंती  गावकर व गोमती गावडे या दोघी काजू बागायतीच्या लागवडीसाठी जात असताना अचानक   एका गव्याने त्यांच्यावर हल्ला  केला. यावेळी गोमती गावडे यांनी  प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला तर जयंती  ही  गव्याच्या तावडीत सापडली.  यावेळी तिच्या पोटात गव्याची शिंगे  लागून ती गंभीर जखमी झाली.  रक्‍तबंबाळ अवस्थेत तिला  घरी आणले. तेथे 108 रूग्णवाहिकेला पाचारण केले, मात्र संबंधित वैद्यकीय सूत्रांनी  उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.  

गोमी गावडे म्हणाल्या, बुधवारी सकाळी 10 वाजता जयंती गावकर यांच्या काजू बागायतीत लागवडीसाठी आम्ही जात होतो. यावेळी वाटेत अचानक गव्याने आमच्यावर हल्ला  केला. बचावासाठी आम्ही दोघींनीही   पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने गव्याने जयंतीवर हल्ला केल्याने ती जबर जखमी झाली.  वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक बेतकेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.  बेतकेकर यांनी  जयंती गावकर यांच्या निधनाबद्दल  शोक व्यक्‍त करून येत्या काळात गावकर्‍यांनी जंगल भागात फिरताना  अधिक सतर्क राहण्याचे आवाहन  केले. या गव्याची  या भागातून हकालपट्टी करण्याची शिफारस आपण वरिष्ठ अधिकार्‍यांकडे करणार असून त्यांनी परवानगी दिल्यास या  गव्याला भागातून हाकलण्यासाठी आवश्यक   ती प्रक्रिया पूर्ण करू. 

मयताच्या कुटुंबांना अभयारण्य कायद्याअंतर्गत एक ते दीड लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद असून याबाबत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन  बेतकेकर यांनी  दिले. मात्र  शक्य असल्यास या कुटुंबाला नोकरी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. दरम्यान, वाळपई पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक  मळीक यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह  शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविला.  पंचायत सदस्य नितेश गावडे म्हणाले, गेल्या अनेक   महिन्यांपासून  या गव्याचा  उपद्रव  सुरु आहे. त्याच्या बंदोबस्ताची मागणी वारंवार करूनही त्याकडे  वनखात्याकडून दुर्लक्ष झाले आहे.  

गावकर कुटुंबाला सरकारकडून ठोस मदत मिळावी

पतीच्या निधनानंतर   तीन मुलांसह   सासूचा सांभाळ  जयंती गावकर याच करीत होत्या. जयंती  यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते. काजू बागायत व रोजंदारीवर काम करून तिने आतापर्यंत संसाराचा  गाडा ओढलेला आहे. या कुटुंबाला सरकारची  ठोस मदत मिळावी, अशी  मागणी ग्रामस्थांनी केली आहे.